- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार

नागपुर : कोरोना संक्रमण काळात ऑक्सिजनचा नागपूर जिल्हयात मुबलक साठा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

 तुटवडा भासल्यास रुग्णालयांनी संपर्क साधण्याचे आवाहन

नागपूर : महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीमार्फत रोजच्या ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला जातो. नागपूर शहरात 17 सप्टेंबरपर्यंत 76.60 मेट्रिक टन ऑक्सिजन अतिरिक्त उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमण काळातील पुरवठ्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमार्फत दररोज ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या बारा पुरवठादारांशी संपर्क साधला जातो. विविध पुरवठादाराकडे असणाऱ्या साठ्याची माहिती घेतल्या जाते. यामध्ये वर्धा व चंद्रपूर येथील पुरवठादार यांचादेखील समावेश आहे. आतापर्यंत वैद्यकीय वापरासाठी 179 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. वैद्यकीय वापर व औद्योगिक वापर यासाठी राज्य शासनाने आरक्षण ठरवून दिलेले आहे. यानुसार वितरण केले जाते. या वाटपानंतरही आजमितीला 76.6O मेट्रिक टन ऑक्सिजनसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश जारी केले होते. निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असेल. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालयाचे परिवहन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य आहेत. तर सदस्य सचिव म्हणून अन्न व औषध प्रशासन नागपूर या विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत.

जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, ऑक्सिजनचा पुरवठा करणारे उत्पादक, ऑक्सिजन निर्मिती होत असलेले सर्व कारखाने, ऑक्सिजनचे मोठे पुरवठादार या सर्वांशी ही समिती समन्वय ठेवत आहे. यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधता येणार आहे. ऑक्सिजन संदर्भातील अडचणीसाठी 0712-2562668 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्राधिकरणाचा हा दूरध्वनी क्रमांक 24 तास सुरू असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *