▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘नागपूर शहराची कायदा व सुव्यवस्था’ उच्चस्तरीय बैठक पार पाडली
नागपूर समाचार : नागपूर येथे झालेल्या हिंसक घटनेबाबत एकूण घटनाक्रम व त्यावर केलेली कारवाई याबाबत आज विस्तृत आढावा घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काही लोकांनी समाज माध्यमांद्वारे खोटा संभ्रम पसरवून अपप्रचार केला, यामुळे ही घटना घडली. पोलिसांनी या हिंसक घटनेला 4-5 तासांमध्येच आटोक्यात आणले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून यामध्ये सहभागी आतापर्यंत 104 लोकांची ओळख पटवण्यात आली असून, यामधील 92 लोकांना अटक देखील करण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये 12 जण 18 वर्षांखालील असल्याने त्यांच्यावर संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच यामध्ये सहभागी आणखी काही जणांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
नागपूर घटना घडावी यासाठी समाजमाध्यमांचा वापर करण्यात आलेला असून, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना देखील दंगलीच्या आरोपात सहआरोपी करण्यात येणार असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. याबाबत 68 सोशल मीडिया पोस्ट दंगल भडकवण्यासाठी करण्यात आल्या व नंतर डिलीट करण्यात आल्याचे, तपासात निष्पन्न झालेले आहे. तसेच या घटनेत ज्यांच्या वाहनांचे व इतर वस्तूंचे नुकसान झालेले आहे, त्यांना शासन भरपाई देणार असून, ही भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संचारबंदीचा भाग सोडल्यास उर्वरित शहरात जनजीवन सुरळीत असून, संचारबंदी असलेल्या भागात पोलीसांची करडी नजर आहे. या भागातही परिस्थिती सुधारल्यास संचारबंदीत शिथिलता आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कठोर शिक्षा करण्यात येईल, यासंदर्भात झिरो टॉलरन्स धोरण राबविण्याचे पोलीस विभागाला निर्देश देण्यात आले आहे. तसेच 30 मार्च रोजी नागपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये यामुळे कुठलाही बदल होणार नसल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर शहर पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.