- Breaking News, नागपुर समाचार

कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी चाचणी ची संख्या वाढविण्यात यावी : फडणवीस

नागपूर : नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्युसंख्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची कोरोना चाचणी सुरु करावी. पुढचा महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी गंभीर आहे. या महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेने यासाठी व्यवस्था उभी करावी, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री. देवेन्द्र फडणवीस यांनी केली.

नागपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावर मनपाने केलेल्या उपाययोजनांसंदर्भात मनपा मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीतील सभाकक्षात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला मा.महापौर श्री.संदीप जोशी, माजी पालकमंत्री मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री मा.डॉ.परिणय फुके, आमदार मा.सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागो गाणार, प्रा.अनिल सोले, मोहन मते, समीर मेघे, प्रवीण दटके, उपमहापौर मा.श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती मा.श्री.विजय झलके, मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त श्री.जलज शर्मा, श्री.राम जोशी, श्री.संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेन्द्र सवाई आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले की, सुरुवातीच्या काळात कोरोनावर चांगले नियंत्रण करण्यात आले. मृत्युसंख्या ही फार कमी होती. परंतु मागच्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर दररोज पाच हजार रुग्णांची तपासणी करण्याची व्यवस्था करावी लागेल. सोबतच मोठ्या संख्येने समोर येणाऱ्या रुग्णांसाठी कोव्हिडकेअर सेंटर, रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन व्यवस्था असलेल्या खाटांची व्यवस्था करावी लागेल. घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपलब्ध करणे तसेच स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा सल्ला दिला. सामाजिक संस्था जर कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यासाठी तयार असेल तर त्यांची सांगड नॉन-कोव्हिड खासगी रुग्णालयांशी घालून द्या, असेही त्यांनी सांगितले.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागपूर शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट यावर भर दिला जात आहे. ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये शिथिलता दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आणि मृत्युसंख्याही वाढली. सद्यस्थितीत दररोज तीन हजार नागरिकांची कोव्हिड चाचणी केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ बघता भविष्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. मनपाच्या माध्यमाने २४ लक्ष लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले होते. वरिष्ठ नागरिकांना, दिव्यांगाना आणि कोरोना रुग्णांना एन.जी.ओ.च्या मदतीने समुपदेशन केले जात आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ७०,००० च्या वर नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे आणि त्याधून ११८९४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आयुक्तांनी सांगितले की, सध्या आर.टी.पी. सी.आर. चाचणी वर भर देण्यात येत आहे. आता यापुढे नागरिकांनी स्वत:च्या जीवनशैलीत आणि राहणीमानामध्ये बदल केला तरच कोरोनावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते.

महापौर श्री. संदीप जोशी म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी मनपाच्या व्यवस्थेला सुदृढ करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांनी ‘औरंगाबाद पॅटर्न’ लागू करण्याची सूचना केली. आमदार सर्वश्री. मोहन मते, परिणय फुके, कृष्णा खोपडे, नागो गाणार, प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, दयाशंकर तिवारी यांनीसुद्धा चर्चेत सहभाग घेतला. यावेळी परिवहन समिती सभापती श्री. नरेन्द्र बोरकर, विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती श्री. धर्मपाल मेश्राम, उपायुक्त निर्भय जैन, अमोल चोरपगार, डॉ.विजय जोशी, डॉ.टिकेश बिसेन यावेळी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *