- Breaking News, नागपुर समाचार

कोरोनामुळे तान्हा पोळ्याला चढली महागाईची ‘झालर’

नागपुर : शेतात राबून आपल्या धन्यासाठी उत्पादन मिळवून देणाऱ्या बैलाला पुजण्याचा ‌दिवस म्हणजे पोळा. यानिमित्ताने गावात खऱ्याखुऱ्या बैलाला पुजले जाते. लाकडी बैलाला सजावटीची ‘झालर’ लावली जाते. यंदा मात्र या उत्सवालाच कोरोना संकटामुळे मगाईची झालर आहे.

श्रावण अमावस्या म्हणजे पोळा. पोळ्याची कर ही बैलाची पूजा करण्याचा ‌दिवस मानला जातो. अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी, भाद्रपद प्रतिपदेच्या निमित्ताने प्रामुख्याने विदर्भात तान्हा पोळा साजरा केला जातो. नागपुरात यादिवशी ‌विविध मैदानांवर पोळा भरवला जातो. लहानगे त्यामध्ये आपापला लाकडाचा बैल घेऊन सहभागी होतात. सहभागी झालेल्यांना खाऊ दिल्यानंतर हा पोळा फुटतो व हे लहानने लाकडाचा बैल घेऊन बोजारा मागण्यासाठी निघतात. अशा या पोळा उत्सवासाठी बाजारात विविध रंगी व विविध आकाराचे लाकडी बैल आले आहेत. मात्र, यंदा त्याच्या किमती तुलनेने अधिक आहेत. लहान मुलांसाठी असलेला सर्वात छोटा लाकडी बैल यंदा 100 रुपयांचा आहे. त्यानंतर थोडा मोठा 120 रुपयांचा आहे.

या दोन्ही प्रकारच्या बैलांची किंमत मागीलवर्षी 100 आणि 130 रुपये होती. हे बैल साधे आहेत. यानंतर चार चाके असलेले व लाकडाच्याच ट्रॉलीवर विराजमान असलेले बैल बाजारात विक्रीस आहेत. अर्धा फूट उंचीचा सर्वात छोटा या प्रकारातील बैल हा 150 रुपयांचा आहे. त्यानंतर 500, 1100, 1800 ते 5 हजार रुपयांपर्यंतचे बैल आहेत. मात्र, या सर्व बैलांची मागीलवर्षीची किंमत 130 ते 4000 रुपयांदरम्यान होती. त्यात यंदा वाढ झाली आहे.

तान्हा पोळ्याच्या दिवशी लहान मुलांमध्ये बैलांना सजविण्याचीदेखील स्पर्धा असते. ही सजावट विविधरंगी झालर, गळ्यात छोट्या-मोठ्या घंट्या, खरड्याचा मुकूट, त्यावर मणी अशा स्वरुपाची असते. एका छोट्या अर्ध्या फूट उंचीच्या बैलाला सजविण्याचा खर्च दिडशे रुपयांच्या घरात आहे. मागीलवर्षी हे सामान ८० रुपयांत होत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.