- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांचा ‘स्मार्ट व्हिलेज’साठी पुढाकार

अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा : स्वस्त घरकुलासह शिक्षण, आरोग्याच्या सुविधा

नागपूर समाचार -: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या प्रकल्पावर आज (शुक्रवार, दि. २१ जून) बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी ‘स्मार्ट व्हिलेज’चे व्हिजन मांडले.

मंत्री महोदयांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, म्हाडाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. भानुसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या धरतीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ निर्माण करावे आणि गरिबांना स्वस्त दरात सर्व सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना ना. श्री. गडकरी यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी ‘स्मार्ट व्हिलेज’चा प्रकल्प कसा असेल, याच्या संकल्प चित्रांचे प्रेझेंटेशनही ना. श्री. गडकरींना देण्यात आले.

यामध्ये स्वस्त दरातील घरकुल, सौरऊर्जा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली, शाळा, जलकुंभ, खेळाची मैदाने, वैद्यकीय सोयीसुविधा, दैनंदिन गरजा आदींचा समावेश असेल. ना. श्री. गडकरी यांनी संकल्पना समजावून सांगताना सोयीसुविधांच्या बाबतीत महत्त्वाच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. त्याचवेळी ‘स्मार्ट व्हिलेज’साठी जागेची निवड करण्यासंदर्भातही ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. उद्योग, शिक्षण, आरोग्य व्यवस्था या सर्वांनी परीपूर्ण असे ‘स्मार्ट व्हिलेज’ अस्तित्वात आले तर खेड्यातील लोकांचे स्थलांतर थांबेल आणि विकासातील अडसर दूर होईल, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.

‘सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबांना स्वस्त दरात सुंदर घर मिळाले, आयुष्यभर वीज व पाणी मोफत मिळाले, गावात उत्तम शाळा झाल्या, उद्योग पोहोचले, सर्व सुविधा मिळाल्या तर खेड्यातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी होईल. त्यादृष्टीने ‘स्मार्ट व्हिलेज’ची योजना तयार करावी अशा सूचनाही ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *