- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांमध्ये समन्वय आवश्यक – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

सीआआयतर्फे शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर चर्चासत्र

नागपूर समाचार -: शैक्षिणक आणि औद्योगिक संस्थांनी सहकार्य, समन्वय आणि संवाद या त्रिसूत्रीवर काम करणे आवश्यक आहे. विदर्भातील समस्या आणि उणीवा ध्यानात घेऊन एकत्र काम केले तर रोजगार निर्मिती होईल आणि गरिबी दूर होण्यास देखील मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले.

कॉन्फेडरेशन अॉफ इंडियन इंडस्ट्रीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ए. के. डोरले सभागृहात ‘नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर अॅकेडेमिया कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आले. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी संवाद साधला. व्यासपीठावर सीआयआयचे चेअरमन सुनील चोरडिया, सीआयआय विदर्भ झोनचे चेअरमन शैलेश आवळे, उपाध्यक्ष श्री जामदार, सीआयआय महाराष्ट्रचे संचालक रोशन कुमार, रामदेवबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश पांडे यांची उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आपल्या प्रदेशात उद्योग आले तर त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. एका मोठ्या उद्योगामुळे त्यावर आधारित छोट्या उद्योगांनाही चालना मिळत असते. त्यासाठी विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर जोर देण्याची गरज आहे. यासोबतच औद्योगिक संस्थांनी देखील आपल्याला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार करावा. आत्मनिर्भर भारतासाठी आपण आपल्या क्षमता आणि उणीवा दोन्ही ओळखून पुढे जावे लागेल.’ व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या दृष्टीने विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचे नियोजन करण्याची गरज असल्याचेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

‘भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायचे असेल तर एक्स्पोर्ट वाढवून इम्पोर्ट कमी करण्यावर भर द्यावा लागेल. ग्रासरूटवर काम करून आपल्या प्रदेक्षाच्या क्षमता ओळखाव्या लागतील. विदर्भात विशेषतः कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात काम करण्यावर भर द्यावा लागेल. कोळसा, कापूस, संत्रा यासारख्या आपल्या जमेच्या बाजू आहेत, त्याचा वापर उद्योग निर्मिती आणि रोजगार निर्मितीसाठी कसा करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. उद्योग निर्माण करताना आपल्या उत्पादनाचा दर्जा, अद्ययावत तंत्रज्ञान, भविष्याचा वेध घेणारे संशोधन याचा आवर्जून विचार करावा लागेल,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *