- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : गडकरींच्या लोकसंवाद यात्रेला पश्चिम नागपुरात उदंड प्रतिसाद!

हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग : बाईक रॅलीने वाढवला उत्साह

नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेला पश्चिम नागपुरात उदंड प्रतिसाद लाभला. यात्रेमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रचार रथासोबत कुणी दुचाकीवर तर कुणी पदयात्रा करीत उत्साह निर्माण केला.

जुना दाभा हनुमान मंदिर येथून पश्चिम नागपूरची लोकसंवाद यात्रा सुरू झाली. सुरुवातीला हनुमान मंदिरात ना. श्री. गडकरी यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ना. श्री. गडकरी यांना महिलांनी औक्षण केले व यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, आशीष देशमुख, माजी महापौर माया ईवनाते, माजी महापौर संदीप जोशी, माजी उपमहापौर संदीप जाधव, माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रगती पाटील, विक्रम ग्वालबंशी, अश्विनी जिचकार, ऋतिका मसराम, शिल्पा धोटे, भूषण शिंगणे, अर्चना पाठक, संगिता गिऱ्हे, रमेश चोपडे, रमेश गिरडे, प्रमोद कवरती आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रत्येक वस्तीमध्ये आणि चौकांमध्ये ना. श्री. गडकरी यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. विविध समाजातील संघटनांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन ना. श्री. गडकरी यांना लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. वयोवृद्ध महिलांनी ना. श्री. गडकरींना औक्षण करून पुष्पहार व गाठी दिली. ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा देत नागपूरचा चेहरा-मोहरा बदलल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ना. श्री. गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरातील भजन मंडळांना साहित्य वितरित केले होते.

यात पश्चिम नागपुरातील भजन मंडळांचाही सहभाग होता. ना. श्री. गडकरी यांनी दिलेले साहित्य घेऊन काही भजन मंडळे लोकसंवाद यात्रेत सहभागी झाले. टाळ, तबला आणि हार्मोनियम वाजवून त्यांनी ना. श्री. गडकरी यांचे स्वागत केले. मुस्लीम समाज बांधवांनी देखील अतिशय उत्साहाने लोकसंवाद यात्रेचे स्वागत केले. सदर येथील आझाद चौकात यात्रेचा समारोप झाला.

‘मी आशीर्वाद घ्यायला आलोय’

गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व करताना शहराचा चेहरा-मोहरा बदलला. उत्तम रस्ते झाले, ७५ टक्के नागपूरला चोवीस तास पाणी पुरवठा होत आहे. मिहानच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळाला आणि भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण आहे. आता नागपूरला एज्युकेशन हब, लॉजिस्टिक्स हब आणि मेडिकल हब म्हणून लौकीक मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असे ना. श्री. गडकरी नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले.

अशी निघाली यात्रा

जुना दाभा हनुमान मंदिर येथून सुरू झालेली यात्रा गणेश नगर चौक, भिवसेन खोरी, हजारी पहाड, मनोहर विहार, प्रेरणा नगर, गंगानगर, बुधवार बाजार चौक, जगदिशनगर चौक, मकरधोकडा, फ्रेण्डस् कॉलनी, विवेकानंद शाळा, जागृती कॉलनी, सुरेंद्रगढ, गुप्ता चौक, बजरंग चौक, दिनेश किराणा, केटीनगर, गिट्टीखदान, शारदा चौक, अनंतनगर चौक, अवस्थीनगर चौक, पासपोर्ट अॉफीस, सादिकाबाद चौक, प्राचीन शिव मंदिर, क्रीडा चौक, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, गोधनी रोड, बाबा फरीद नगर, राजनगर, छावणी, गड्डीगोदाम चौक, गणेश मंदिर, मोहननगर चौक, चौरसिया चौक, माऊंट रोज, अशोक हॉटेल, कराची गल्ली, सदर पोलीस चौकी या मार्गाने आझाद चौकात पोहोचली व यात्रेचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *