- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भाऊ काणेंनी सन्याशाप्रमाणे व्रतस्थ राहून क्रीडा क्षेत्राची सेवा केली – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक भाऊ काणे यांना श्रद्धांजली

नागपूर समाचार : भाऊंनी आपल्या जीवनात एक उत्तम क्रीडा प्रशिक्षक म्हणून लौकिक प्राप्त केलाच; शिवाय आध्यात्मिक साधनेकडेही त्यांचा ओढा होता. त्यांनी आपल्या प्रशिक्षणातून उत्तम खेळाडू तयार करण्याचे कार्य अतिशय समर्पित भावनेतून केले. एखाद्या सन्यासाप्रमाणे व्रतस्थ राहून त्यांनी क्रीडा श्रेत्राची सेवा केली, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक भाऊ काणे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या वतीने ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व मार्गदर्शक भाऊ काणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेला ना. श्री. नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटना, विदर्भ खो-खो संघटना आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन अॉफ नागपूर या संघटनांनीही सभेत सहभाग घेतला.

यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक शरद सूर्यवंशी, धनंजय काणे, राम ठाकूर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी भाऊ काणे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘भाऊंनी स्वतः खेळ सोडल्यानंतर अनेक खेळाडू तयार केले, हे त्यांचे खूप मोठे यश आहे. त्यांच्या तालमीत अने खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले, त्याचे श्रेय भाऊंच्या जिद्दीला जाते. एक क्रीडा प्रशिक्षक म्हणून त्यांची भूमिका मोलाची होतीच, पण ते अनेकांच्या जीवनात मार्गदर्शक होते. अनेकांच्या जीवनावर त्यांचा प्रभाव होता. त्यांनी आयुष्यभर निःस्वार्थ भावनेने खेळाडू आणि खेळासाठी काम केले.’ भाऊ माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे होते. त्यांचे अचानक जाणे माझ्यासह सर्वांसाठी धक्कादायक आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. योगसाधना, अध्यात्म आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते, असेही ते म्हणाले.  

‘शो मस्ट गो ऑन’

जिद्द, चिकाटी ही भाऊंच्या जीवनाची वैशिष्ट्ये होती. खेळाडू कितीही कच्चा असला तरीही त्याला उत्तम खेळाडू म्हणून घडविण्याचे सगळे कौशल्य भाऊंकडे होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. आज भाऊ नाहीत, पण ‘शो मस्ट गो ऑन’प्रमाणे त्यांचे कार्य सुरू राहिले पाहिजे, अशी अपेक्षा ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *