- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : गरिबांच्या कल्याणासाठीच नागपुरात विकासकामे – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

उत्तर नागपूरात विकासकामे भुमी पूजन व लोकार्पण 

नागपूर समाचार : नागपूरचा चौफेर विकास होत करताना गोरगरीब जनता केंद्रस्थानी आहे. गरीबांना चोवीस तास पाणी मिळावे, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांच्या घरातील युवा पिढीला रोजगार मिळावा या उद्देश्याने नागपूर शहरात सातत्याने विकासकामे सुरू आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले.

उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील बिनाकी तलावाचे पुनर्जीवन व विकासकामांचे भूमिपूजन तसेच नारी-१ जलकुंभाचे व विविध आयुष्मान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. कांजी हाऊस चौकात आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, गणेश कानतोडे, वीरेंद्र कुकरेजा आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आज उत्तर नागपुरात पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाले, याचा आनंद आहे. भारतात चोवीस तास पिण्याचे पाणी देणारी नागपूर महानगरपालिका ही एकमेव आहे. मी राजकारणात आलो तेव्हा अर्जूनदास कुकरेजा, प्रभाकरराव दटके आदी लोक आम्ही महापालिकेवर पाण्यासाठी मोर्चा घेऊन जायचो. आज तशी स्थिती नाही. आज नागपुरात टँकरची गरज नाही. ७० टक्के नागपूरला सुरळीत पाणीपुरवठा होत आहे.

आता नव्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण नागपूरला चोवीस तास पाणी मिळणार आहे.’ ‘नागपूरचा चेहरा मोहरा बदलला आहे. मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार झाले आहेत. आता नागपूरची मेट्रो कन्हान गावापर्यंत पोहोचणार आहे. मेट्रोचा हिंगण्यापर्यंत विस्तार होणार आहे. मेट्रोच्या तिकिटांचे दरही कमी करण्यात आले आहेत. लवकर मेट्रो सहा डब्यांची होणार आहे. नागपूरची मेट्रो गुणवत्तेच्या निकषांत देशात सर्वोत्तम आहे,’ असे सांगतानाच विकासकामांचा लाभ गरिबांनाच होणार आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष्मान योजनेच्या माध्यमातून देशभरातील गरिबांना लाभ मिळत आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘कमाल चौकात मी माझ्या आईच्या स्मरणार्थ डायग्नोसीस सेंटर निर्माण करत आहे. या ठिकाणी एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे आदी गोष्टी अत्यंत माफक दरात होणार आहेत. यामागे गरीब लोकांची सेवा करणे हा एकमेव उद्देश्य आहे. आजवर अनेक उपक्रम राबविले, पण कधीही जात-पात-धर्माचा विचार केला नाही. माझ्यासाठी मानव धर्म हाच सर्वांत मोठा धर्म आहे. नागपूरचा विकास करताना कधीही भेदभाव केला नाही,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

‘सिकलसेलचा प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध’

उत्तर नागपुरातील ८० टक्के लोक सिकलसेल, थॅलेसिमियाने ग्रस्त आहेत. या आजारांवर नागपुरात उपचार व्हावा यासाठी आपण एम्समध्ये यंत्रणा तयार करीत आहोत. या माध्यमातून दिव्यांग, शोषित, पीडित, दलित, आदिवासींचे जीवन सुसह्य करण्याचा माझा प्रयत्न आहे, अशा भावना ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *