- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप रविवारी

क्रीडा भूषणसह यंदा तीन नवे पुरस्कार

नागपूर समाचार  : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा रविवार 28 जानेवारी रोजी समारोप होणार आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता यशवंत स्टेडियमवर आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असेल. सुप्रसिद्धी बॉलिवूड गायक बी. प्राक यांच्या गाण्यांचा कार्यक्रम हे या सोहळ्याचे आकर्षण असेल, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी दिली आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय समारंभात यंदा क्रीडा भूषण पुरस्कारासोबतच तीन नवीन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट संघटक आणि उत्कृष्ट संघटना असे तीन नवीन पुरस्कार यंदा मान्यवरांच्या हस्ते दिले जातील. नागपूर जिल्ह्यातील विविध खेळांच्या प्रशिक्षकांपैकी उल्लेखनीय कामगिरी करणा-या प्रशिक्षकाला उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर विविध स्पर्धांचे योग्य आयोजन करणा-यांना उत्कृष्ट संघटक (ऑर्गेनायजर) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर नागपूर शहरातील विविध संघटना, मंडळ, क्लब यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा संघटनेला उत्कृष्ट संघटना (असोसिएशन) पुरस्कार दिला जाणार आहे. 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या तिनही पुरस्कारांसाठी खासदार क्रीडा महोत्सवाच्या निवड समितीमार्फत पुरस्कार्थींची निवड केली जाणार आहे. दरवर्षी दिला जाणा-या क्रीडा भूषण पुरस्कारासाठी विविध खेळांच्या खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले असून त्यापैकी निवड झालेल्या खेळाडूंना 25 हजार रुपये रोख असे स्वरूप असलेला क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

12 जानेवारीला खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले तेव्हापासून शहरातील वेगवेगळ्या 65 क्रीडांगणांवर 55 खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या खेळांचे 12 हजार 500 सामने घेण्यात आले. यामध्ये 2325 संघांचा सहभाग राहिला. यात 4800 ऑफिशियल्स तर 65 हजार खेळाडूंचा सहभाग होता. विजेत्यांना 1100 ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. तर 12300 मेडल्स देखील प्रदान करून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या भव्य महोत्सवात विजेत्यांना एकूण 1 कोटी 35 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. मध्य भारतातील स्थानिक स्तरावरील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा रविवारी 28 जानेवारी रोजी समारोप होत आहे. या भव्य महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्यात सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

प्रवेशिका येथे मिळवा

तेरी मिट्टी में मिल जावा…, बारीश की जाये…, रब्बा वे…, अच्छा सिला दिया…, दिल तोड के…, मेरे यार…, क्या लोगे तुम… रांझा, अल्ला के बंदे…, धोके, प्यार के धोके… अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी श्रोत्यांच्या मनावर राज्य करणा-या बी.प्राकच्या गाण्यांचा दिमाखदार सोहळा समारोपीय कार्यक्रमाचे आकर्षण आहे. समारोपीय सोहळा नि:शुल्क असून येथे प्रवेशासाठी प्रवेशिका गरजेची आहे. खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने खालील ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजता पर्यंत प्रवेशिका प्राप्त करण्याचे आवाहनही समितीद्वारे करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे कार्यालय वीर सावरकर चौक ऑरेंज सिटी हॉस्पीटल समोर, खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील मुख्य कार्यालय, यशवंत स्टेडियम, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ आणि जिंजर मॉल जरीपटका या ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *