- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपुरात १३, १४ व १५ जानेवारीला तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाट्याचा प्रयोग

यशवंत स्टेडियमवर २०० कलाकार साकरणार महानाट्य

नागपूर  समाचार : नागपूर महानगरात प्रशासनामार्फत १३, १४ व १५ जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. प्रवेश मोफत असेल मात्र त्यासाठी प्रवेशिका आवश्यक आहे. नागरिकांनी मोठया संख्येने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आणि 350 व्या राज्य शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील पहिला राज्यव्यापी प्रयोग नागपूर येथे होत आहे.

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ नागपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 13, 14, व 15 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियमवर प्रयोग होणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून व्हावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. त्यानंतर प्रशासन तयारीला लागले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार इतिहासकार शिवशाहिर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग यशवंत स्टेडियमवर 30 हजारापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे.यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.

दररोज सायंकाळी साडेपाच वाजता नंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *