- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूर करारानुसार राज्याचे हिवाळी अधिवेशन होत नाही, म्हणूनच व्यक्त केला संताप – प्रकाश पोहरे

नागपूर समाचार : नागपूर कराराप्रमाणे एक तर सहा आठवड्यांचा अधिवेशनाचा करार असताना केवळ २ आठवड्यांचे, म्हणजे ७ ते २० डिसेंबर, असे यावर्षीचे अधिवेशन ठरले. त्यातही पहिला दिवस गुरुवार शोक प्रस्तावात गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अर्धा दिवस कामकाज चालले. त्यानंतर विरोधकांनी बहिष्कार करून वॉकआऊट केले आणि काम बंद झाले. नंतर शनिवार – रविवार सुट्ट्या आल्या, म्हणजेच ४ दिवस वाया गेले. ११ डिसें सोमवारी पुन्हा विदर्भाच्या प्रश्ना व्यतिरिक्त चर्चा, नंतर १२ मंगळवार, १३ बुधवार, १४ गुरुवारपर्यंत आरक्षण विषयी चर्चा चालली, विदर्भाचा एकही प्रश्न चर्चेत घेतला गेला नाही. या शिवाय पुरवणी मागण्या, ज्या खरे तर अधिवेशनाच्या शेवटी घेतल्या जायला हव्यात; त्या आधीच घेण्यात आल्या. त्यामुळे सभागृहात अगदी मोजके ८ – ९आमदार उपस्थित होते, आणि त्यातच अध्यक्ष्यानी अजून जवळपास ५० आमदार बोलणार असे जाहीर केले, म्हणजे अजून शुक्रवारी चर्चा चालणार, नंतर शनिवार, रविवार, उरले केवळ ३ दिवस, त्यावेळी उत्तरे, म्हणजे अधिवेशन समाप्त.

त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी मी पत्रकार गॅलरीत असताना अखेर माझा संयमाचा बांध फुटला आणि कुणीतरी मुंबईचे एक सदस्य अनावश्यक विषयांवर बोलत असताना मी तिथून आवाज दिला, आणि इतकेच बोललो की विदर्भाच्या समस्यांसाठी येथे अधिवेशन होत असते. मग, विदर्भाच्या समस्येवर चर्चा करणार की नाही? विदर्भात अधिवेशन घेऊन विदर्भाच्या मुद्यावर चर्चा होत नसेल तर, अधिवेशन कशाला घेता? लोकांच्या पैशाचा आणि वेळेचा अपव्यय कशाला करता? असे प्रश्न उपस्थित करून बाहेर आलो. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी मला घेराव घातला आणि बराच वेळ झाल्यानंतर माझी तिथून सुटका झाली.   

प्रश्न असा आहे, की मी मला पत्रकार गॅलरीतून घोषणा का द्याव्या लागल्या? गेल्या ६३ वर्षांत नागपूरात विधानसभा अधिवेशन भरत आहे. आणि गेल्या काही वर्षांत एकट्या विदर्भात १,५०,००० शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. विदर्भात दररोज १४ शेतकरी आत्महत्या होत आहेत. जसे मी पत्रकार गॅलरीतून आवाज उठवल्याबरोबर भाजपाचे प्रतोद असलेले आमदार आशिष शेलार यांनी सभागृहातच प्रश्न विचारला… ‘अध्यक्ष महाराज, हे काय चालले आहे…’ पण, नागपुरात अधिवेशन होत असताना शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेले हेच आमदार शेतकरी आत्महत्यांवर ‘अध्यक्ष महाराज, हे काय चालले आहे…’ असा प्रश्न का विचारत नाही? असा सामान्य माणसाचा प्रश्न आहे…. उलट विदर्भ विकासासाठी आवश्यक हिवाळी अधिवेशन नागपुरात घेताना गौतमी पाटील यांच्या नृत्याचे कार्यक्रम किंवा जलसा आयोजित करून राज्याचे मंत्री, आमदार फक्त सहल करण्यासाठी विदर्भात येतात असा लोकांचा आरोप आहे.

अधिवेशनात नुस्त मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील व छगन भुजबळ, हेच विषय आहेत; जणू काही हे अधिवेशन केवळ त्यासाठीच आहे! या विषयी एक स्वतंत्र विशेष अधिवेशन सरकारने जरूर घ्यावे, मात्र या विदर्भाच्या अधिवेशनात प्राधान्याने विदर्भाच्याच प्रश्न आणि त्याचे समाधान अपेक्षित असतांना भलत्याच विषयावर चर्चा अपेक्षित नाही.

विदर्भाचे मुख्य पिक कापूस, तूर, सोयाबीन, गहू, धान व संत्रा. कापसाचे सारे भवितव्य हे आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असते. जागतिक बाजारपेठेत दर चढे असले तर फायदा होतो; पण महाराष्ट्राच्या सरकारने इकडे `टेक्सटाईल इंडस्ट्री’ची संपूर्ण वाट लावून टाकली आहे. त्यामुळे ‘सोन्याची कराड’म्हणून ओळखल्या जाणार्‍या विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांवर अभूतपूर्व अवकळा आली. विदर्भातील १२ कापडमिल बंद झाल्या. बहुतांश सहकारी सूतगिरण्या बंद पडल्या, सहकारी जिनिंग-प्रेसिंग संस्थांचीही हीच अवस्था आहे. सद्य:स्थितीत केवळ दोन ते तीन सूतगिरण्या तग धरून आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी जसे साखर कारखानदारी, सहकारी बँकिंग चळवळीने विकासाचे अंकुर फुलवले, त्यांच्या भागाचे आर्थिक सक्षमीकरण केले, दुधाच्या धंद्याने शेतकर्‍यांना बळ दिले, विदर्भातून कापूस नेऊन सूतगिरण्या उभारल्या आणि त्या यशस्वीपणे चालवूनही दाखवल्या. याउलट महाराष्ट्राचे सरकार जेव्हा कापूस उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय करून विदर्भाच्या संपूर्ण अर्थकारणाचाच सत्यानाश करत होते तेव्हा विदर्भातील नेते काय करत होते, हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. नोकरीसाठी विदर्भाबाहेर होणारे तरुणांचे व नंतर आई-वडिलांचे स्थलांतरणामुळे लोकसंख्या कमी झाल्याने विदर्भातील ६६ चे ६२आमदार आणि ११ खासदाराचे १० झाले.

गहू, तांदूळ, कांदा निर्यात बंदी, निर्यात होणाऱ्या संत्रा वर ८८ रु कर,, असे हे इतके सर्व प्रश्न असतांना इतर प्रश्नावर चर्चा कशी?

माझे केवळ इतकेच म्हणणे होते, की राज्याचे मंत्रिमंडळ विदर्भात नागपूरला येत असतील तर केवळ विदर्भ आणि विदर्भातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करा. 

नागपूर अधिवेशनात विदर्भाच्या मुद्यांवर कोणीच बोलत नसल्याचे मी पाहत होतो. त्यामुळेच पत्रकार गॅलरीत येऊन विदर्भाबद्दल का बोलत नाही, एवढीच विचारणा मी केली होती. विदर्भातील आमदार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर बोलत नसल्याने माझ्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराला हाऊसमध्ये बोलावे लागले आहे, इतके….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *