- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : देशाला ‘भारत’ म्‍हणून संबोधण्‍याचा संकल्‍प करुया – भाग्‍यश्री साठ्ये 

नेत्री संमेलनाचा समारोप 

नागपूर समाचार : आपला ‘भारत’ कपड्यांवरून नाही तर संस्‍कृती, परंपरा व चारित्र्यावरून ओळखला जातो, असे स्‍वामी विवेकानंदांनी शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेला अमेरिकेत गेले असता ठणकावून सांग‍ितले होते. भारत ही आपली खरी ओळख असून आज या नेत्री संमेलनात सर्व महिलांनी देशाला ‘भारत’ म्‍हणून संबोधण्‍याचा संकल्‍प करायचा आहे. हे आपल्‍या देशाच्‍या विकासात आपले पहि‍ले योगदान राहील, असे आवाहन भाग्‍यश्री साठ्ये यांनी केले. 

एक दिवसीय नेत्री संमेलनाच्‍या समारोपीय सत्रात त्‍या बोलत होत्‍या. या सत्राला प्रमुख अतिथी म्हणून मॉईलच्‍या एचआर डायरेक्‍टर उषा सिंग यांची उपस्‍थ‍िती होती तर मंचावर महिला समन्वयच्या अखिल भारतीय सह-संयोजिका भाग्यश्री साठ्ये, व‍िदर्भ प्रांत समन्‍वय‍िका मीरा कडबे, कल्‍याणी काळे यांची उपस्‍थ‍िती होती. भाग्‍यश्री साठ्ये यांनी ‘भारताच्‍या विकासात मह‍िलांची भूम‍िका’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

 

गाव, शहरांचा भौतिक विकास म्‍हणजे समग्र विकास नसून देशाचा विकास हा प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या आध्‍यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कला, साह‍ित्‍य, क्रीडा अशा सर्व क्षेत्रातील विकास झाल्‍याने होईल, असे भाग्‍यश्री साठ्ये यांनी सांगितले. मातृत्‍व, नेतृत्‍व व कतृत्‍व या तीन गुणांवर आपण काम केले तर ख-या अर्थाने नेत्री बनून देशाला वैभव प्राप्‍त करून देऊ शकतो, असे त्‍या म्‍हणाल्‍या. 

ब‍िहारच्‍या रहिवासी असलेल्‍या उषा स‍िंग यांनी आपली संघर्षगाथा सांगितली. एक महिला निर्धार आणि आत्‍मविश्‍वासाच्‍या जोरावर कोणत्‍याही क्षेत्रात यश प्राप्‍त करू शकते. नेत्री संमेलनात इतक्‍या मोठ्या संख्‍येने एकत्रित आलेल्‍या महि‍ला समाजात मोठे परिवर्तन आणू शकतात, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता मडावी यांनी केले. सीमा सराफ यांनी वैयक्तिक गीत सादर केले. तर श्रुती गांधी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *