- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : भक्तीचा महापूर नव्हे तर झरा अंतःकरणात निर्माण व्हावा; धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांची सप्तधान्याने तुला

नागपूर समाचार : सणवार आले, उत्सव आले की देवदर्शन करायचे, दानधर्म करायचा, देवळांना रंगरंगोटी करायची जणू काही भक्तीचा महापूर आला आहे. परंतु भक्तीचा झरा अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे तो केवळ बाह्य बाबीतून व्यक्त व्हायला नको असा हितोपदेश धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांनी केला. अयोध्या नगर येथील प.पू. विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राचा तपपूर्ती सोहळ्याचा आज समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते.  

उपासना करताना भक्ती अंतःकरणातुन व्हावी अशी अपेक्षा त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. दरम्यान मन, मेंदू आणि मनगट ही त्रिसूत्री अत्यंत महत्वाची असून मन आणि मेंदू हे साधना, उपासनेतून बळकट होते तर शाररिक स्वास्थ्यातून मनगट अर्थात बलशाली राहते येते असा संदेश आज धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांनी भक्तांना दिला.

दासबोध, उपनिषद यामधून मिळणाऱ्या संस्कारांसोबत आपल्या विचारांची सांगड घालून आपण आपला मेंदू आणि मन बळकट करू शकतो. शिवचरित्राचे वाचन आणि पठण केल्यावर लक्षात येते की मनगट बळकट असेल तर आपण कुठल्याही विकृतीला सामर्थ्याने तोंड देऊ शकतो. महाराष्ट्राचे हे भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजां सारखा आदर्श, वसा आणि व्यासपीठ लाभले आहे. शिवचरित्र हा एकमेव ग्रंथ आहे त्यात एकही न्यूनता नाही त्यामुळे शिवचरित्र मन, मेंदू आणि मनगट बळकटीसाठी सर्वोत्तम आहे असे महाराज म्हणाले. 

याशिवाय उपासना केंद्र कशी चालवावी, तिथले उपक्रम, सामाजिक भावना, राष्ट्रीयत्वाच्या भावना कश्या जपाव्या या बद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केले. उपासना केंद्र बरोबरच केंद्र प्रमुख कसा असावा ह्याचे पण मार्गदर्शन त्यांनी केले.अयोध्या नगर अध्यात्मिक केंद्राच्या स्तुत्य उपक्रमांचा सद्गुरुदास महाराजांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. तपपूर्ती ही सोपी गोष्ट नसून त्यासाठी सातत्य महत्वाचे असलयाचे ते म्हणाले.

सुरवातीला आध्यात्मिक साहित्य लिहणाऱ्या श्रीमती इंगळे यांचा सत्कार सद्गुरुदास महाराज यांच्या हस्ते झाला. यावेळी इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी सप्तधान्याने सद्गुरूदास महाराज यांची तूला झाली. विश्वहिंदू परिषद संचालित मातृशक्ति संस्थेच्या सहसचिव शरयू श्रीपाद चितळे या वेळी उपस्थित होत्या. हे सर्व धान्य मातृशक्ति संस्थेच्या ईशान्येकडील मुली रहात असलेल्या छात्रावासाला दान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात अभय पांडे यांच्या वैयक्तिक गीताने झाली. सूत्र संचालन मास्टर अद्वैत सोहनी यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केंद्र प्रमुख शशांक सोहनी यांनी केले.जवळ जवळ ५०० भक्तांनी महाप्रसाद ग्रहण केला. तपपूर्ती सोहळा यशस्वी करण्यासाठी अयोध्या नगर केंद्रातील उपासक व परिसरातील नागरिकांनी परिश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *