- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : अवयवदानासाठी जिल्हास्तरावर मोहीम राबविण्यात येणार – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर  समाचार : अवयवदान हे ईश्वरीय कार्य असून अवयवदानाची मोहीम राबविण्याची गरज आहे. जनजागृती हा घटकही अवयवदान मोहीमेसाठी महत्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज अवयव, देहदान विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यासह जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

नेत्रदानासाठी लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे अवयव देहदानाचे महत्त्व वाढविण्याची गरज आहे. काहीजण देहदान करून समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना पहायला मिळते. अवयवदान म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते किंवा ज्या व्यक्तीचा ब्रेन डेड होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातील किडनी, हृदय, यकृत, डोळे, फुफ्फुस, स्वादुपिंड हे अवयव देणे होय.

एखादी आजारी व्यक्ती आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवतो की, माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दवाखान्यात द्या, देहदान करा किंवा शरिरातील किडनी, यकृत डोळे, त्वचा गरजू रुग्णांना द्या. तेव्हा गरजू रुग्णांवर डॉक्टर्स या अवयवाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे कुणाला किडनी मिळते तर कुणाला डोळे. किडनी, लिव्हरमुळे जीवनदान मिळते. हे मोठे सामाजिक कार्य असल्याचे जिल्हाधिकारी बैठकीत म्हणाले.

जिल्ह्यातील अवयवदान, देहदान करणाऱ्या दात्यांचा लवकरच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल, खाजगी रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल तसेच विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *