- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : विदर्भाच्‍या सर्वांगीण विकासासाठी खासदार औद्योगिक महोत्‍सव – नितीन गडकरी

‘एड’ व ‘अॅडव्‍हांटेज विदर्भ’च्‍या लोगोचे अनावरण 

नागपूर समाचार  : विदर्भात पायाभूत सुविधा मुबलक प्रमाणात असून येथे गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आले तर विदर्भाचा सर्वांगीण विकास होईल. ही बाब लक्षात घेऊन खासदार औद्योग‍िक महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात येणार असून हा महोत्‍सव केवळ नागपूरचा नसून संपूर्ण विदर्भाचा आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केले. 

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) तर्फे 27,28 व 29 जानेवारी 2024 दरम्‍यान खासदार औद्योग‍िक महोत्‍सव ‘अॅडव्‍हांटेज विदर्भ’ चे आयोजन करण्‍यात येणार आहे. ‘पाथ टू ग्रोथ’ या मध्‍यवर्ती संकल्‍पनेवर हा महोत्‍सव आधारित या महोत्‍सवाच्‍या तयारीसाठी शुक्रवारी हॉटेल सेंटर पॉइंट येथे बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला ‘अॅडव्‍हांटेज विदर्भ’चे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह भंडाराचे खा. सुनील मेंढे, गडचिरोलीचे खा. अशोक नेते, रामटेकचे खा.कृपाल तुमाने, राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे, माजी खा. अजय संचेती, उद्योगपती सत्‍यनारायण नुवाल यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

मंचावर ‘एड’चे अध्‍यक्ष आशीष काळे, उपाध्‍यक्ष प्रणव शर्मा व गिरीधारी मंत्री, सचिव विजय शर्मा, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी व कार्यकारिणी सदस्‍य मंचावर उपस्‍थ‍ित होते. बैठकीला विदर्भातून मोठ्या संख्येने उद्योजकांनी उपस्‍थ‍िती लावली. 

सुरुवातीला विदर्भाच्‍या औद्योगिक विकासाचे प्रणेते व बजाज स्‍टील ग्रुपचे संस्‍थापक हरगोविंद बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली.

‘अॅडव्‍हांटेज विदर्भ’चा उद्देश शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या कमी करणे व युवकांना रोजगार उपलब्‍ध करून देणे हा आहे. विदर्भातील मागास जिल्‍ह्यातदेखील उद्योगाचा विकास झाल्‍यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, त्‍याने गरीबी दूर होईल आणि विदर्भात समृद्धी येईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

‘विदर्भ रत्‍न’ पुरस्‍कार द्या

विदर्भातील सर्व संघटनांना, उद्योगांना जात, पात, पंथ, पक्ष यांच्‍या पलिकडे जाऊन ‘एड’शी जोडावे, विदर्भातील सर्वाधिक उत्‍पादन देणा-या, सर्वाधिक नफा कमावणा-या व सर्वाधिक रोजगार निर्माण करणा-या उद्योगांना ‘विदर्भ रत्‍न’ पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करावे, अशा सूचना त्‍यांनी ‘एड’ च्‍या कार्यकारिणीला केल्‍या. 

आंतरराष्‍ट्रीय गुंतवणूकदारांची उपस्‍थ‍िती 

बैठकीला आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर गुंतवणूकदार अॅथेन्‍स येथून आलेले स्‍टार्टअप ग्रीसचे थानोस पराचोस व ऑलिम्पिया कोका यांची उपस्‍थ‍िती कार्यक्रमात उत्‍साह भरून गेली. त्‍यांनी आगामी जानेवारी ‘अॅडव्‍हांटेज विदर्भ’ मध्‍ये सहभागी होणार असल्‍याचे सांगितले. 

अॅडव्‍हांटेज विदर्भसाठी 4 कोटी

अॅडव्‍हांटेज विदर्भचे प्रमुख प्रायोजक गोयल गंगा ग्रुपचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अतुल गोयल यांचा सत्‍कार नितीन गडकरी यांच्‍या करण्‍यात आला. अतुल गोयल यांनी ‘अॅडव्‍होंटेज विदर्भ’साठी 4 कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य दिल्‍याची माह‍िती ग‍िरीधारी मंत्री यांनी यावेळी दिली. 

लोगोचे अनावरण 

असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) आणि अॅडव्‍हांटेज विदर्भच्‍या लोगोचे नितीन गडकरी व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विमोचन करण्‍यात आले. सोबतच, अॅडव्‍हांटेज विदर्भची सविस्‍तर माह‍िती देणारा माह‍ितीपट प्रदर्शित करण्‍यात आला.

उपस्‍थ‍ित मान्‍यवरांनी खासदार औद्योगिक महोत्‍सवाच्‍या संकल्‍पनेसाठी नितीन गडकरी यांचे कौतुक करताना हा महोत्‍सव विदर्भाच्‍या विकासात महत्‍वाची भूमिका बजावेल, अशी विचार व्‍यक्‍त केले. आशीष काळे यांनी उपस्‍थ‍ितांचे स्‍वागत केले तर प्रास्‍ताविक डॉ. विजय शर्मा यांनी व आभार प्रदर्शन राजेश रोकडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *