- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘पीएम स्कील रन’चे उत्साहात आयोजन; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती

नागपूर समाचार : भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. अर्थव्यवस्थेत भारताने इंग्लंडलाही मागे टाकले आहे. येत्या काळात कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

युवक-युवतींमध्ये कौशल्य विकासाविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी सात वाजता ‘पीएम स्कील रन’ ही दौड आयोजित करण्यात आली. दीक्षाभूमी परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकातून पीएम स्किल रनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.  

राज्य शासनाने कौशल्य प्रशिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कौशल्यावर आधारित पीएम विश्वकर्मा या एका नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे. या माध्यमातून पारंपारिक कारागीर तसेच बारा बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या माध्यमातून कौशल्यपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

पीएम स्कील रन ही दौड आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी तसेच जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहे, मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते बक्षिस वितरण

दौडमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना यावेळी प्रमाणपत्र व बक्षिस वितरण करण्यात आले. विकास बिसने, भारत शाहू आणि तेजस बनकर यांनी पुरुष गटात तर महिला गटात मोना सोमकुवर, निकीता शाहू आणि तृप्ती बावणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व व तृतीय स्थान पटकावले. कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे आयुक्त डॅा. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे आदी उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने दौडमध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार आयुक्त डॅा. रामास्वामी एन. यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *