- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : वीर सावरकर म्हणजे अर्पण, तर्पण व समर्पण : पं. अग्निहोत्री

राधेश्याम चांडक यांना सावरकर रत्न पुरस्कार प्रदान

वर्धा समाचार : वीर सावरकर हे केवळ एक व्यक्ती नव्हे तर तो एक विचार आहे. देशप्रेमासह विविध अंगी कर्तृत्वाने मातृभूमीची सेवा करणारे वीर सावरकर हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. अर्पण, तर्पण व समर्पण या त्रिगुणांचा अनोखा संगम म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.

ते 28 रोजी आयोजित सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती व स्वा. सावरकर सामाजिक सेवा सन्मान समारंभात बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, लोकतंत्र सेनानी हरिभाऊ वझुरकर, गौरीशंकर टीबडिवाल, मोतीराम तराळे यांची उपस्थिती होती. पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले, मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणारी आणि देशाचं नाव विश्‍वात मोठं करणारी जे काही लढवय्ये महाराष्ट्रात होऊन गेली त्या सर्वांमध्ये स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशभक्ती, स्वदेशीचा पुरस्कार, प्रखर क्रांतिकारक म्हणून केलेले कार्य, विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्त्व, तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, संघटन कौशल्य, समाजाप्रती आग्रही भूमिका घेणारे समाजसुधारक, इतिहासकार, नवनवीन शब्द देऊन मराठी भाषेला समृद्ध करणारे भाषातज्ज्ञ, भविष्याची रूपरेषा ओळखणारा राजकारणी, ओजस्वी वक्ते आणि प्रतिभाशाली साहित्यिक अशा अनेक गुणांच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन केवळ धर्म, मातृभूमी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वा. सावरकरांनी झोकून दिले होते, असे ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना चांडक यांनी स्वा. सावरकरांना झालेल्या वेदना अंदमानला गेल्यानंतरच कळू शकतात, असे सांगितले. आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना टप्प्या टप्प्याने अंदमानची वारी घडवली, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आयुष्यात एकदा अंदमानला गेले पाहिजे, असे सांगून सावरकर स्मारकासाठी शक्य तेवढी मदत आमची संस्था करेल, असा विश्‍वास त्यांनी दिला. हरिभाऊ वझूरकर यांनी स्वा. सावरकर स्मारक उभे करण्यासाठी आर्थिक हातभार लावून पुण्य पदरात पाडण्याचे आवाहन केले. यावेळी मोतीराम तराळे यांनीही सत्काराला उत्तर दिले. यावेळी राधेश्याम चांडक यांना स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविक श्याम देशपांडे यांनी केले. संचालन प्रफुल्ल व्यास यांनी केले तर आभार प्रचिती देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख, विजय देशपांडे, अनिल नरेडी, मंगेेश परसोडकर, धनंजय देशपांडे, सतीष बावसे, मकरंद उमाळकर, विलास कुळकर्णी, जयानंद पानसे, अनिल पाखोडे, आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी अतुल देशपांडे, शैलेश देहाडराय, डॉ. राजेंद्र बोरकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *