- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : स्पिक मॅकेचा दुसरा दिवस लोककलेला समर्पित

पुंगचोलम, पोवाडा आणि गुरुबानीचा उमटला निनाद

नागपूर समाचार : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि स्पिक मॅके व इनक्रेडिबल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(व्हीएनआयटी)येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सव आज खऱ्या अर्थाने लोककलेला समर्पित असा राहिला. आज महोत्सवाचा दुसरा दिवस मणिपुरी संकीर्तन संगीत आणि शास्त्रीय नृत्य पुंगचोलोम, महाराष्ट्रीय लोकसंगीत शाहिरी आणि पंजाबचे दैवी संगीत गुरुबानी ने दरवळला.

सुप्रसिद्ध मणिपुरी संगीतकार आणि भक्ती संकीर्तनाचे मणिपूर डांन्स अकादमीचे गुरु क्रिती सिंह यांच्या चमूने पुंगचोलोम या मणिपुरी लोककलेचा अविष्कार रसिकांसमोर सादर केला. संगीत आणि विशिष्ट शारीरिक हालचालींमधून फुलत जाणाऱ्या त्यांच्या कलाकृतीने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. पांढऱ्याशुभ्र धोती, उपरणे, फेटा या पेहराव्यात सादर करण्यात आलेले हे ताल-नाद व नृत्याने परिपूर्ण असे हे लोकनृत्य होते. हातावरील ठेका आणि मृदूंगाच्या ठेक्यावरील काही क्षण तर दैवी अविष्कारासारखे होते. मृदूंग वादनात व नृत्यात त्यांच्या चमूमध्ये असलेली लय, एकसूत्रता, तालबद्धता, चेहऱ्यावरील हावभाव, अप्रतिम शारीरिक संतुलनाला रसिकांनी टाळ्यांचा गजरात उभे राहून मानवंदना दिली.

यावेळी सुप्रसिद्ध शाहीर विजय पांडे यांनी आपल्या दख्खनी आवाजातून रसिकांसमोर सादर केलेला महाराष्ट्रीय लोककला असलेला तुळजाभवानी वरील पोवाडा आसमंत भेदून गेला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित गणेशस्तवनाने सुरु झालेल्या या लोककलेने डफ, टाळ, तबला, पेटीसारख्या पारंपरिक वाद्याच्या गजराने रसिकांच्या अंगावर काटा उभा केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील संतांनी भजन, कीर्तन आणि भारुडांमधून केलेल्या सामाजिक कार्याची जाणीव आपल्या पोवाड्यातून आणि कवनातून करून दिली. त्यांच्या चमूने सादर केलेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील चरित्र पोवाडा रसिकांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. तर, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा रसिकांना शिवकाळात घेऊन गेला. त्यांनी आपल्या अप्रतिम खंजिरी वादनातून विविध वाद्याच्या नादांची निर्मिती करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

गुरुबानीच्या मंजुळ स्वरांनी डॉ. अलंकार सिंग व त्यांच्या शिष्यांनी यावेळी उपस्थितांना ‘स्वर्गादपि गरियसी’ अशी अध्यात्मिक अनुभूती दिली. त्यांनी गायलेली शबद, संदीपसिंग यांनी दिलरुबा वाद्यातून हळुवार स्वरांनी दिलेली साद, नरेंद्रसिंग यांचे अप्रतिम तबलावादन ऐकून जणू आपण गुरुद्वारामध्ये असल्याचा भाव सर्वांमध्ये जागृत झाला. त्यांनी धनासरी रागात गायलेली गुरुस्तुती गंधर्वाला देखील भुरळ पाडणारी होती. गुरमत संगीतातील आसा रागात संत कबीरदासांनी लिहिलेली ‘हॉ वारी मुख फेर प्यारे’ व गुरुग्रंथसाहिबमधील संत नामदेवांची ‘रामा तार रे’ हि शबद देखील त्यांनी यावेळी सर्वांसमोर सादर केली.

आज स्पिक मॅकेने खऱ्या अर्थाने उपस्थितांना दैवी कलेचे आणि भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवले. कार्यक्रमादरम्यान स्पिक मॅकेच्या ज्येष्ठ स्वयंसेविका मधुपर्णाजी आणि गुरु कांतापुरा यांनी मणिपुरी संगीतकार गुरु क्रिती सिंह व त्यांच्या पथकाचा सत्कार केला. तसेच शाहीर विजय पांडे व त्यांच्या चमूचा सत्कार स्पिक मॅकेच्या मंजिरी सिंहा आणि व्हिएनआयटीच्या प्राध्यापिका नीता पाटणे तर, डॉ. अलंकार सिंग चमूचा सत्कार ज्येष्ठ स्वयंसेवक कैलाश पालिया यांनी केला.

योगाभ्यास आणि श्रमदानाने झाली पहाट 

स्पिक मॅकेचा दुसरा दिवस उजाडला तो योगाभ्यास आणि श्रमदानाने ! बिहार स्कुल ऑफ योगचे स्वामी त्यागराज स्वरस्वती यांनी हट योग, नाद योगचा अनुभव स्वयंसेवकांना आणि उपस्थितांना करवून दिला. योगाभ्यासातून आपला मानसिक आणि शारीरिक विकास योग्यरितीने होत असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी कोड्डियाट्टम व गुरुबानीच्या मंगलमय सादरीकरणाने सकाळ अधिकच मनोहर वाटत होती. तर सकाळचा सत्रात झालेल्या श्रमदान उपक्रमातून स्वच्छता आणि एकोप्याची भावना सर्वांमध्ये निर्माण झाली. दुपारच्या सत्रात पार पडलेली योग निद्रेची कार्यशाळा तर सर्वांसाठी अविस्मरणीय अनुभव होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *