- Breaking News, नागपुर समाचार, मनोरंजन

नागपुर समाचार : तृषांत इंगळेला पदार्पणातच दिग्‍दर्शनाचा ‘‍फिल्‍मफेअर’

नागपूर समाचार : मागील काही वर्षांपासून हिंदी व इंग्रजी नाटक तसेच, हिंदी चित्रपटांमध्‍ये विविध भूमिकांमधून कार्य करीत असलेल्‍या नागपूरच्‍या युवा दिग्‍दर्शक तृषांत इंगळे याला ‘झॉलिवूड’ या चित्रपटासाठी उत्‍कृष्‍ट दिग्‍दर्शकांचा ‘फिल्‍मफेअर’ पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. ‘झॉलिवूड’च्‍या माध्‍यमातून तृषांतने चित्रपट दिग्‍दर्शनाच्‍या क्षेत्रात पाऊल ठेवले असून पदार्पणातच त्‍याला हा पुरस्‍कार मिळाल्‍यामुळे सर्वत्र त्‍यांचे कौतूक होत आहे. 

विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीच्‍या पार्श्‍वभूमीवर तयार झालेल्‍या ‘झॉलिवूड’ ला ‘क्रिटीक्‍स अवॉर्ड फॉर बेस्‍ट फिल्‍म’, ‘बेस्‍ट डेब्‍यू डायरेक्‍टर’, ‘बेस्‍ट एडिटींग’ व ‘बेस्‍ट स्‍क्रीनप्‍ले’ या चार गटात फिल्‍मफेअरचे नामांकन प्राप्‍त झाले होते. ‘बेस्‍ट डेब्‍यू डायरेक्‍टर’ या पुरस्‍कारासाठी अजित वाडीकर, प्रताप फड, रितेश देशमुख व संकेत माने हे स्‍पर्धेत होते. या सर्वांना मागे टाकत तृषांतने उत्‍कृष्‍ट दिग्‍दर्शकासाठीचा ‘फिल्‍मफेअर’ आपल्‍या नावावर केला. त्‍यामुळे आजपर्यंत विदर्भाच्या एका कोपऱ्यात असलेल्‍या झाडीपट्टी रंगभूमीच्‍या इतिहासाला नवी झळाळी मिळाली आहे. 

तृषांतने याआधी पृथ्‍वी थिएटरला काम केले असून अनेक हिंदी, इंग्रजी नाटकांमध्‍येही अभिनय केला आहे. असिस्‍टंट कास्‍टींग डायरेक्‍टर म्‍हणून काम करत असतानाच त्‍याने नवाझुद्दीन सिद्धीकी यांच्‍यासोबत ‘मांझी द माऊंटन मॅन’ मध्‍ये, मनोज वाजपेयी यांच्‍यासोबत ‘बुधिया सिंग – बॉर्न टू रन’ तसेच, ‘शैतान’ या चित्रपटात भूमिका केल्‍य आहेत. ‘चित्रपट दिग्‍दर्शित करण्‍याची खूप इच्‍छा होती पण संधी मिळत नव्‍हती. अखेर ‘झॉलिवूड’ ने संधी दिली आणि फिल्‍मफेअरसारखा मानाचा पुरस्‍कार मिळवून दिला. त्‍यामुळे खूप आनंदी व समाधानी आहे’, असे तृषांत म्‍हणाला. 

सात वर्षांचे संशोधन व अडीच कथा व पटकथा लेखनासाठी दिल्‍यानंतर 2018 साली ‘झॉलिवूड’ चित्रपटाची शुटिंग झाली. पण त्‍यानंतर आलेल्‍या कोरोनामुळे अडीच वर्ष या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले होते. विविध देशातील चित्रपट महोत्‍सवांमध्‍ये पुरस्‍कार पटकावल्‍यानंतरही ‘झॉलीवूड’ च्या वाट्याला उपेक्षाच आली. अखेर 3 जून 2022 रोजी रोजी महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित झाला. काही काळ हा चित्रपट वादाच्‍या भोव-यात सापडला आणि तर काही ठिकाणी बंदी नाट्य रंगले होते. पण चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक ग्लॅमरस मानला जाणारा फिल्‍मफेअर मिळाल्‍यामुळे अथक परिश्रमांचे चीज झाल्‍याची भावना तृषांत इंगळे याने व्‍यक्‍त केली. 

तृषांतने या यशाचे श्रेय अमित मासूरकर यांच्‍यासह झाडीपट्टीतील सर्व कलाकार आणि ‘झॉलीवूड’ च्या कलावंतांना दिले आहे. ‘हा पुरस्‍कार केवळ माझा एकट्याचा नसून संपूर्ण विदर्भाचा आणि झाडीपट्टीचा आहे’, असे तो म्‍हणाला. 

अत्यंत हलाखीची परिस्थितीत मिळेल ते काम करत तृषांतने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नाटकातदेखील तो काम करत होता. त्याच दरम्यान त्याने झाडीपट्टीत बालकलाकार म्हणून काम केले व तेथून मिळालेल्‍या पैशातून मुंबई गाठली. त्‍याने केलेल्‍या अपार कष्‍टांचे फळ आज त्‍याला मिळाले. 

– फुलवंती इंगळे, तृषांतची आई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *