- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरच्या इंदोरा चौक ते दिघोरी चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन

नागपूर समाचार : नागपूरच्या इंदोरा चौक- ते – दिघोरी चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या फक्त पुलाच्या बांधकामाकरता कुठल्याही नागरिकाची एक इंचही जमीन अधिग्रहीत केली जाणार नाही .या पुलासाठी मलेशियन तंत्रज्ञान वापरण्यात आले असून त्यामुळे उड्डाणपुलाच्या दोन पिलर्स मधील अंतर हे 120 मीटर राहणार असून वरचा बीम हा ‘स्टील फायबर’ मध्ये कास्ट होणार आहे, त्यामुळे उड्डाणपुलाची गुणवत्ता सुधारण्यासोबतच बांधकाम खर्चही कमी होणार आहे, अशी माहिती केंदीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. स्थानिक गोळीबार चौकामध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणाऱ्या इंदोरा चौक-अशोक चौक-शीतला माता चौक-दिघोरी चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी वर प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

उड्डाणपुलाबद्दल माहिती देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की या उड्डाणपुलाच्या खालील हा रस्ता चौपदरी राहणार असून कमाल टॉकीज चौकातून रिंग रोडला जोडण्याचे काम सुद्धा या प्रकल्पात होईल.अशोक चौकामध्ये वेगवेगळ्या दिशेने शहराच्या विविध भागात निघणाऱ्या रस्त्यांच्या वाहतुक कोंडीला आळा घालण्यासाठी हा चौक रोटरीच्या (चक्राकार रस्त्याच्या) माध्यमातून सिग्नल विरहित करण्यात येईल.

या रोटरीमुळे रेशीमबाग चौक , दिघोरी या चौकात सहजपणे निघता येणार आहे. नागपूर शहरातील पारडीचा उड्डाणपूल तसेच कामठी येथील डबल डेकर पूल सुद्धा येत्या दोन महिन्यात पूर्ण होतील अशी घोषणा देखील त्यांनी केली. आज नागपूर शहरात भारतीय व्यवस्थापन संस्था, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय विधी विद्यापीठ यासारख्या उच्च शिक्षणसंस्था सोबतच सिम्बॉयसिस सारख्या शैक्षणिक संस्था आहेत आता नागपुरात नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था येणार असून राज्याच्या इतर भागात नागपूरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर कमी झाल असून याच धर्तीवर नागपूर ते पुणे हे अंतर केवळ साडेचार तासात कापणे शक्य होईल असा एक महामार्ग आम्ही बांधतो आहे. असे देखील त्यांनी सांगितलं.  

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये सुमारे 1 हजार कोटी रुपयाच्या नवीन काँक्रीट रस्त्याला मंजुरी मिळाली असून 300 कोटी नागपूर मनपाला दिले असून केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे 100 महत्त्वाचे रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे बनतील अशी घोषणा यावेळी केली. नागपूमधील सर्वात लांब असणारा हा प्रस्तावित उड्डाणपुल सुमारे 1,000 कोटीच्या तरतुदीने बांधण्यात येणार असून यामुळे वाहतूक कोंडी समाप्त होईल . नुकत्याच नागपूरमध्ये जी- 20 च्या अंतर्गत सिविल-20 ची जी बैठक झाली त्यामध्ये नागपूर शहरातील विकास कामे पाहून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी नागपूर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याचे उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली असे देखील फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले. नागपुर शहरातील पार्किंग प्लाझा, स्मार्ट ट्राफिक मॅनेजमेंट व्यवस्था, दाभा येथील कृषी सुविधा केंद्र, नागपूर -गोवा मार्ग, मेट्रो प्रकल्प फेज-2, लॉजिस्टिक पार्क, वैद्यकीय महाविद्यालयांना निधी ,पंतप्रधान आवास योजना या विविध विकास प्रकल्पाची माहिती सुद्धा त्यांनी दिली.  

मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी या उड्डाणपुलाची रचना वारंवार बदलल्या गेल्या असल्याने त्याचा सातत्याने पाठपुरावा आपण केला असल्याची माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, नागपूर शहरात सुमारे 12,000 कोटीचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले आहे . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक डॉ.अरविंद काळे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, उपस्थित होते. 

या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा एक कार्यक्रम दक्षिण नागपुरातील सक्करदरा येथेही पार पडला. याप्रसंगी नितीन गडकरी यांनी नागपूर -अमरावती रस्त्यावरील दोन उड्डाणपूलाचे बांधकाम पुढल्या तीन महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती दिली. हा उड्डाणपूल हिस्लॉप कॉलेजच्या पुढे उतरणार असून सिताबर्डी येथील व्हरायटी चौकातील रोड सुद्धा सिमेंट काँक्रीटचा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. सक्करदरा तलाव येथे सौंदर्यीकरण करून अंडरग्राउंड पार्किंगच्या व्यवस्थेसह येथे एक फूड प्लाझा तयार केल्यास नागरिकांना येथे सुविधा निर्माण होईल असे गडकरी यांनी नमुद केले. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्करदाराच्या तलावाच्या सौंदर्यीकरण आणि संवर्धनाकरिता 40 कोटी रुपयांचा निधी देखील जाहीर केला. याप्रसंगी दक्षिण नागपुरचे आमदार मोहन मते, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

उड्डाणपूलाविषयी-

नागपूर शहरातील इंदोरा चौक-अशोक चौक-शीतला माता चौक-दिघोरी चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी वर प्रस्तावित उड्डाणपुल सुमारे 998 . 27 कोटी रुपयांच्या तरतूदीने बांधण्यात येणार असुन या प्रस्तावित उड्डाणपूलाची लांबी 8.9 किमी राहणार आहे. या प्रकल्पातील सर्व्हिस रोडची लांबी 13.82 किमी राहणार आहे . या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे .या उड्डाणपुलाची रचना 2 लेनच्या रूपात केली आहे ज्याची रुंदी 12 मीटर आहे.उड्डाणपुलाची रचना UHPFRC (अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीट) ने केली आहे . या प्रकल्पात दोन ROB – रेल्वे उड्डाणपुल आणि RUB रेल्वे भूयारी मार्गाचा प्रस्ताव समाविष्ट केला आहे.नागपूरच्या पाचपावली येथील विद्यमान ROB तोडून त्याची पुनर्बांधणी केली जाईल, पूर्व दिशला (नाईक तलावाच्या दिशेने) आणि पश्चिमेकडील (पाचपावलीच्या दिशेने) विद्यमान रॅम्प कायम ठेवले जातील.डागा स्मृती स्त्री रुग्णालयात अप/डाऊन रॅम्प प्रस्तावित आहे.भंडारा रोड, मेडिकल चौक आणि नागपूर बसस्थानकाकडे सध्याच्या जोडलेल्या रस्त्यांकडे अप/डाऊन रॅम्पसह अशोक चौकात एक एलिव्हेटेड रोटरी ( चक्राकार रस्ता) म्हणून पायलॉनची रचनाही यात प्रस्तावित आहे.उड्डाणपुलाच्या बांधकामा अंतर्गतच रस्तेही विकसित केले जातील ज्यामध्ये 3 प्रमुख जंक्शन आणि 11 लहान जंक्शन यांचा समावेश राहणार आहे .हा प्रस्तावित उड्डाणपुल उत्तर नागपुरच्या इंदोरा चौकापासून सुरू होईल आणि दक्षिण नागपूरच्या दिघोरी चौक येथे संपेल.

या उड्डाणपूलाचा भाग दाट लोकवस्तीच्या नागरी भागातून जात आहे जेथे अनेक व्यावसायिक आस्थापने, दुकाने, स्थानिक बाजार आहेत. या भागात होणारी वारंवार वाहतूक कोंडी, अपघात, रेल्वे क्रॉसिंगवर जाम या समस्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाने सुटणार आहेत . भंडारा आणि उमरेडच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील सुरळित होईल.

जंक्शन विकसित केल्याने अपघातांची संख्या कमी होईल तसेच प्रवासाच्या वेळेत शहरी भागात प्रदूषण नियंत्रणासह इंधनाची बचत होईल .इंदोरा चौक ते सीए रोड, दिघोरी, उमरेड, शासकीय रुग्णालय, बस स्थानक या दिशेने प्रवासाचा वेळ आणि इंधनाची सुद्धा बचत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *