- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम जगण्याला नवी दिशा देतात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विभागीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

नागपूर समाचार : महसूल अधिकारी व कर्मचारी यांना लोकाभिमुख काम करताना येणारा तणाव कमी करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम उपयोगी ठरून जगण्याला नवी दिशा देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या नागपूर विभागीय क्रीडा व संस्कृतिक स्पर्धेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर (भंडारा), जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे (गोंदीया) व वरिष्ठ महसूल अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रावीण्य दाखवण्याची संधी मिळते.महसूल विभाग लोकाभिमुख असून अधिकारी कर्मचारी नवीन-नवीन कार्यपदधती आणून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करत असतात. महसूल विभागात सुरू असलेल्या ई-ऑफीस, ई-पंचनामा यासारख्या डिजिटल क्रांतीमुळे शासकीय कामात पारदर्शता, गतिशिलता व लोकाभिमुखता येईल. उत्तम कार्यालय व पायाभूत सुविधा असल्यास काम अधिक चांगले करता येते, म्हणून नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन वास्तू लवकरच तयार करण्यात येणार आहे. तसेच भंडाराचे जिल्हाधिकारी कार्यालय देखील अद्यावत करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला.

महसूल आणि गृह विभागाने चांगले काम केले तर शासनाची चांगली प्रतिमा निर्माण होते. राज्यात हे दोन्ही विभाग चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले. तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्यांवर शासन सकारात्मकतेने निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रास्ताविकेतून महसूल विभागाद्वारे सेवा पंधरवाड्यानिमित्त विभागात 13 लाख अर्ज निकाली काढण्यात आले असल्याचे सांगितले. अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी कोटयवधी मदतनिधीचे वाटप, तसेच ई-ऑफीस प्रणाली सुरू करून तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे सांगितले. लवकरच ई-पंचनामा प्रणालीत सॅटेलाईटचा डाटा थेट मिळवून व नागरिकांना स्वत:च पंचनामा अपलोड करता येईल अशी प्रणाली विकसित करून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक धमाल….

उपमुख्यमंत्री महोदयांच्या संबोधनानंतर क्रीडा संकुलाच्या मुख्य डोममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये सर्वप्रथम चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर नागपूर आयुक्त कार्यालय, नागपूर जिल्हा, भंडारा या जिल्ह्यांनी आपले सादरीकरण केले.

महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय व्यावसायिक कलाकाराप्रमाणे नाटक, नृत्य, वाद्यवृंद वाजविणे, एकपात्री प्रयोग, लावणी, गीत गायन, स्टँडअप कॉमेडी सादर केली. रात्री उशिरापर्यंत या कार्यक्रमाचा आस्वाद कर्मचाऱ्यांनी घेतला. उद्या उर्वरित जिल्ह्याचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाला विभागातील महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *