- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : बाबूषा यांच्‍या कवितेतून स्त्री सौंदर्य दडलेले – वसंत आबाजी डहाके

बाबूषा कोहली यांच्या अनुवादित मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नागपूर समाचार : बाबूषा कोहली यांच्या कवितेत स्त्री सौंदर्य दडलेले असून स्त्रियांची जाणीव,स्त्री प्रेम त्यांच्या कवितांमधून प्रकट होते, असे मत ज्‍येष्‍ठ साहि‍त्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले. 

युवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त बाबूषा कोहली यांच्या ‘प्रेम गिलहरी दिल आखरोट’ या हिंदी काव्य संग्रहाचा ‘ईश्‍वर मला गुणगुणतो दीप रागासारखा’ चा शीर्षकांतर्गत रवींद्र रुक्‍म‍िणी पंढरीनाथ यांनी मराठी अनुवाद केला असून या मराठी कवितासंग्रहाचे प्रकाशन वसंत आबाजी डहाके यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विदर्भ साहित्य संघ आणि वर्ण मुद्रा पब्लिकेशन यांच्यावतीने विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अमेय दालनात झालेल्‍या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विदर्भ साह‍ित्‍य संघाचे अध्‍यक्ष प्रदीप दाते होते तर गणेश कनाटे व अभ‍िषेक जाखडे यांच्‍यासह बाबूषा कोहली, अनुवादक रवींद्र रुक्‍मिणी पंढरीनाथ, अनुराधा मोहनी, श्याम माधव धोंड यांची उपस्थित होती.

वसंत आबाजी डहाके म्हणाले, मराठी भाषेमध्ये साहित्य अनुवादित करताना शब्दाचा लहेजा तसाच टिकून राहील याची काळजी घ्यावी लागते. मराठी भाषेचे सौंदर्य अबाधित ठेवावे लागते. कविता जश्याच्या तश्या वाचकांपुढे ठेवाव्‍या लागतात. बाबूषा यांच्या कवितेत लपलेली स्त्री जाणीव ही फक्त स्त्रीला दिसेल. कारण स्त्रीला तसा मानसिक प्रदेश तिला प्राप्‍त झालेला असतो. या कविता समजुन घ्यायला पुरुषांना अधिक प्रयत्न करावे लागतील. 

भारतीय कवितांमधील रोमॅटिझम आता कवितांमधून लुप्‍त होत चालला असून सामाज‍िक व राजकीय वर्णनाच्‍या कवितांचे प्रमाणही कमी झाले आहे असे सांगताना गणेश कनाटे यांनी बाबूषा यांच्‍या कविता प्रतिमांची मनात उकल करतात, असे गौरवोद्गार काढले. सर्व भाषांमधील साह‍ित्‍याचा मराठीत अनुवाद होत असताना मराठी साहित्‍य इतर भाषांमध्‍ये अनुवादित होण्‍याचे प्रमाण कमी असल्‍याबद्दल त्‍यांनी खंत व्‍यक्‍त केली. अभिषेक जाखडे यांनी अनुवादाच्या संकल्पना स्पष्ट केल्या. प्रदीप दाते यांनी अध्‍यक्षीय भाषणातून बाबूषा कोहली यांच्‍या साहित्‍यविषयक जाणीवांचे कौतूक करताना विदर्भ साहित्‍य संघांशी यानिमित्‍ताने त्‍यांचे नाते निर्माण झाल्‍याचे सांगितले. अनुराधा मोहनी व श्याम धोंड यांनी कवितांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मनोज पाठक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *