- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : व्हीएनआयटीमध्ये ‘श्रीअन्न’ विषयावर दोन दिवसीय अधिवेशन

जिल्हाधिकारी करणार 15 फेब्रुवारी रोजी उद्घाटन, श्रीअन्न खाद्य उत्सवाचेही आयोजन

नागपूर समाचार : वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय श्रीअन्न (मिलेट) वर्ष म्हणून साजरे केले जात असून देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवदेखील साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) च्या मिलेट अॅक्शन ग्रुप, नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ विमेन चाइल्ड अँड यूथ डेवलपमेंट नागपूर व भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत असलेल्या कापूस विकास संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीअन्न’ विषयावर 15 व 16 फेबुवारी 2023 दरम्यान दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या अधिवेशनाला भारत टेक फाउंडेशन व थिंक इंडिया व्हीएनआयटी चॅप्टर या संस्थांचे ही सहकार्य लाभत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन बुधवार दिनांक 15 फेबुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. व्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनीयरींग विभागात होणा-या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची उपस्थिती राहणार असून व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांच्यासह नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ विमेन चाइल्ड अँड यूथ डेवलपमेंट नागपूर या संस्थेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राजेश मालवीय तसेच, कापूस विकास संचालनालय नागपूर विभागचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे यांची विशेष उपस्थिती राहील. दिवसभर गुणवत्ता वृद्धी करणारी उत्पादने, प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे, शेतक-यांची गटचर्चा, सादरीकरण इत्यादी विविध सत्र आयोजित करण्यात आले आहेत. 

16 फेबुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता ‘श्रीअन्न – एक आश्वासक पशुखाद्य’ विषयावर सत्र होणार असून श्रीअन्नच्या प्रसार व प्रचारासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता अधिवेशनाचा समारोप मा. डॉ. मीताली सेठी ( भा.प्र.से.), संचालक, वसंतराव नाईक स्टेट अॅग्रीकल्चर एक्सटेंशन मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिटयूट (वनामती) नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. 

या अधिवेशनात विशेषत्‍वाने श्रीअन्नचे उत्पादन घेणारे 10000 लघुकृशक यांचे प्रतिनिधीत्व करणारे पश्चिम महाराष्‍ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगढ व उत्तर प्रदेश राज्यातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच, आदिवासी भागात श्रीअन्नचे संवर्धन करणा-या बैगा आदिवासी महिला, पुरुष तसेच तेजस्वीनी नारी चेतना महिला संघ, कोदो कुटकी प्रक्रिया केन्द्राचेचे प्रतिनिधी आपले अनुभव सादर करतील. अधिवेशनात मिलेटचा प्रचार, प्रसार, संवर्धन तसेच मार्केटिंग व शेतक-यांना याचे योग्य मूल्य मिळण्याकरिता भावी रणनीतीवर चर्चा केली जाणार असून पुढील 10 वर्षांच्‍या नियोजनाबाबत महत्‍वाचे निर्णय घेण्यात येणार आहे.

‘श्रीअन्‍न खाद्य उत्‍सव’ विशेष आकर्षण 

बुधवार दिनांक 15 फेबुवारी रोजी दुपारी 5 वाजता ‘श्रीअन्‍न खाद्य उत्‍सव’ चे विशेष आयोजन व्‍हीएनआयटीच्‍या सभागृहात करण्‍यात आले असून यात पाच प्रकारचे मिलेट बियाणे, मिलेटचे विविध प्रकारचे पदार्थ जसे की शेव, चकली, कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा, डोसा, सांबार वडा, समोसा, कचोरी , बेकरी उत्पादने, मिल्कशेक इत्यादि चे स्टॉल ठेवण्यात आले आहे. त्यासह व्‍हीएनआयटीच्‍या स्टार्टअप ‘क्रिएट’ कडून काही मिलेट वर आधारित उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असेल. उपस्थितानी अतिशय पौष्टिक अशा श्रीअन्नाने तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन व्हीएनआयटीच्या मिलेट अॅक्शन ग्रुपचे सदस्य प्रा. अनुपमा कुमार, प्रा. रत्नेश कुमार व प्रा. सचिन मांडवगणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *