- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपुर समाचार : मृत्युला कलरफूल करणारा प्रयोग; मोक्षदाह संजय भाकरे फाउंडेशन ची प्रस्तुती

मृत्युला कलरफूल करणारा प्रयोग : मोक्षदाह संजय भाकरे फाउंडेशन ची प्रस्तुती

नागपुर समाचार : आयुष्याचे किती प्लॅनिंग करतो आपण, अगदी तासा-तासापासून पुढील अनेक वर्षा पर्यतचे, ज्याची कोणतीही शाश्वती नसतांना देखील, मग मृत्युचे प्लॅनिंग का नको ? आयुष्याचे एक टोक जन्म आहे तर दुसते टोक मृत्यू आहे, आपण एकाच टोकाला घट्ट पकडून ठेवतो दुसर्‍या टोकाचा विचार करतच नाही. त्याला तसेच सोडून देतो, एकदिवस अचानक तो समोर येतो, तेंव्हा कळते की, अरे, आयुष्य तर जगायचे राहूनच गेले. लेखक ङॉ. सोमनाथ सोनवलकर यांनी लिहीलेल्या अप्रतिम संवादांना संजय भाकरे (वासुदास) आणि अनीता जोशी (इरावती) यांच्या सुंदर अभिनयाच्या जोरावर मोक्षदाह या नाटकाला अप्रतिम सादरीकरणाचा साज चढविला आहे.

संजय भाकरे फाउंडेशन ने निर्मित केलेल्या नाटकाचा प्रयोग विदर्भ गौरव प्रतिष्ठान विष्णुजी की रसोई आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने साई सभागृह शंकर नगर नागपूर येथे रसिकांच्या प्रचंड गर्दीत झाला. निपुत्रिक दाम्पत्य वासुदास आणि इरावती वयाच्या उतारवयात इच्छामरणाची याचिका न्यायालयात दाखल करतात. चार पाच वर्ष कोर्ट केवळ तारीख आणि सहानुभूती देवून त्याचा निर्णय देत नाही, उद्विग्न झालेला वासुदास, लहानपणी अब्बू अम्मीच्या तलाख नंतर एकटी असलेल्या नाझिया (कल्याणी गोखले) ला लिव्हर चे दान करणार्‍या वासुदास कडे समुपदेशन करायला न्यायालयाचे आदेशाने प्रवेश होतो. मृत्यू पश्चात आपल्या शरीराच्या उपयोग गरजवंतांना व्हावा म्हणून अवयवदानाची इच्छा, अपेक्षा करणारा, ज्यांनी हे जग बघितले नाही त्यांना नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या दांपत्याना न्यायालय न्याय देत नाही. शरीर जाळून पर्यावरणाला धोका निर्माण का करायचा ? देहदान, करून मोक्ष प्राप्ती व्हावी या उद्देशाने आत्महत्ये पासून दूर असावे असे संदेश देणारे कथानक.

जेष्ठ अभिनेते संजय भाकरे यांनी साकारलेला वासुदास त्याच्या अनुभवी कारकिर्दीची साक्ष देतो. अनीता जोशी यांनी दिलेली साथ म्हणजे अभिनयाची जुगलबंदीच या नाटकातून बघण्यासारखी आहे. कल्याणी गोखले हिने केलेली भूमिका दाद देवून गेली. अनिल जोशी यांचा आपटे भाव खाऊन जातो. चारच पात्र असलेल्या नाटकात रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची किमया कलावंतांनी साकारली आहे. नाटकाचे दिग्दर्शन अ‍ॅड. अजय घारे यांनी केले असून नाटकाचे सुंदर नेपथ्य सतीश काळबांडे यांनी केले आहे. अप्रतिम प्रकाश योजना शिरीष धर्माधिकारी यांनी केली आहे. संगीत संयोजन संकेत महाजन, रंगभूषा रामजी श्रीवास, रंगमंच्यामागे सुत्रधार शेखर मंगळमूर्ती, विलास खंनगण, सार्थक पांडे समर्थपणे सांभाळली आहे. नाटकाची निर्मिती अनीता भाकरे यांची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *