- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : राहुल देशपांडे व शौनक अभिषेकी यांनी सुश्राव गायनाने जिंकले; विठ्ठल भक्‍ती तल्‍लीन झाले रसिक

स्व. अरुणा प्रभाकर बेलसरे स्मृतिप्रीत्यर्थ सप्‍तकचे आयोजन 

नागपुर समाचार : पंढरीचा वास, संत भार पंढरीत, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, अवघे गरजे पंढरपूर, कानडा राजा पंढरीचा असे एकाहून एक दमदार विठ्ठल भक्‍तीचा जागर करणारे अभंग सादर करून सुप्रसिद्ध शास्‍त्रीय गायक राहूल देशपांडे व शौनक अभिषेकी यांनी रसिकाना भक्‍तीरसात चिंब भिजवले.

प्रसंग होता सप्‍तकतर्फे स्व. अरुणा प्रभाकर बेलसरे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रमाचा. कविकुलगुरू कालिदास सभागृहात शुक्रवारी झालेल्‍या या कार्यक्रमाला रसिकांनी चांगलीच गर्दी केली. 

कार्यक्रमाला ज्‍येष्‍ठ संवादिनी वादक प्रभाकर बेलसरे, अॅड. गौरव बेलसरे यांची उपस्‍थ‍िती होती. त्‍यांनी राहूल देशपांडे, शौनक अभिषेकी, संवादिनी वादक तन्मय देवचाके, तबल्या वादक निखिल फाटक व पखवाज वादक प्रसाद जोशी यांचा सत्‍कार केला.

राहूल देशपांडे यांनी राग भूप मधील पारंपरिक बंदिशीने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्‍यानंतर त्‍यांनी सावरे अयजयो ही स्‍व. वसंतराव देशपांडे यांची पारंपरिक बंदिश सादर केली. त्‍यानंतर शौनक अभिषेकी यांनी राग अडाणा सादर करून ताल रूपक मध्ये मध्यलयीत बांधलेली बंदिश सादर केली. त्‍यानंतर राग सूहा कानडा सादर केला. त्‍यानंतर दोघांनी मिळून संगीत मैफलीत मजेदार किस्‍से सांगत अधिक रंगत भरली. दिल की तपिश आज है आफताब, हे सुरांनो चंद्र व्‍हा, चंद्रमा नभात गायिले, बागळ्यांची माळ फुले, शब्दावाचून कळले सारे अशी अनेक गीते सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *