- Breaking News

नागपुर समाचार : 108 वी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ ची विद्यापीठात तयारी

जिल्हाधिकारी व कुलगुरुंच्या उपस्थितीत आढावा

नागपुर समाचार : भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. जिल्हाधिकारी व कुलगुरूंच्या मार्गदर्शनात यासंदर्भातील आढावा घेण्यात आला.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेला देश-विदेशातून मान्यवर येणार आहेत. या ठिकाणी उपस्थित होणारे विषय, संशोधन, चिंतन देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान जगताला नवे वळण देणारे असते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान व्यासपीठावर या वार्षिक आयोजनाचे महत्त्व आहे .याचे यजमानपद यावर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मिळाले आहे. त्यानिमित्ताने सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठक व्यवस्था, मनुष्यबळ उपलब्धता, पायाभूत सुविधा व पाणीपुरवठा या संदर्भात आज मार्गदर्शन करण्यात आले.

यापूर्वी 1914 मध्ये भारतात विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोलकत्ता येथे पहिल्या भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कृषी, वने, प्राणी, मत्स, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र पर्यावरण माहिती तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र, अशा 14 विविध विभागांवर नवनवीन शोध प्रबंध,भव्य प्रदर्शनी,मार्गदर्शन आणि यामध्ये तज्ञांचा सहभाग, अशी विज्ञानाला समर्पित व्यापकता या संमेलनाची असते. या संमेलनामध्येच राष्ट्रीय किशोर विज्ञान संमेलन देखील घेण्यात येते. यासाठी किशोर वैज्ञानिकही नागपूर येथे मुक्कामी असतील.

राष्ट्रीय स्तरावरील या संमेलनाच्या जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर शास्त्रज्ञ, संशोधक या काळात नागपूर शहरात असणार आहेत. याशिवाय गेल्या काळात महत्वपूर्ण संशोधन करणाऱ्या प्रमुख संस्था या ठिकाणी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू एस.आर.चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजया बनकर, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *