- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : खासदार सांस्कृतिक महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘तथागत’ महानाट्याद्वारे अभिवादन

पं. प्रभाकर धाकडे यांच्‍या वादनाने नागपूरकर मंत्रमुग्‍धखा; सदार सांस्कृतिक महोत्‍सवाचा पाचव्‍या दिवस

नागपुर समाचार ‍: ज्या महापुरुषाचे आपण अनुयायी आहोत त्‍या भगवान बुद्धाच्‍या, त्‍यांच्‍या ज्ञान व तत्‍वज्ञानाचा प्रचार व प्रसार व्‍हावा, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुद्ध आणि त्‍यांचा धम्‍म’ हा ग्रंथ लिहिला होता. बाबासाहेबांच्‍या या बुद्ध चरित्राचा नाट्यमय आविष्‍कार असलेल्‍या ‘तथागत’ या महानाट्याद्वारे त्‍यांना मंगळवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त अभिवादन करण्‍यात आले. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या सर्वधर्मसमभावाचा संदेश देणा-या मध्‍य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाच्‍या पाचव्‍या दिवशी राज्‍यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्‍य साधून भगवान बुद्ध यांच्‍या जीवनचरित्रावर आधारित ‘तथागत’ या महानाट्याचा 100 वा प्रयोग सादर करण्‍यात आला. तत्‍पूर्वी, सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजीचे व्‍हायोलिन वादन झाले. आजच्‍या दिवसाची सुरुवात श्‍याम देशपांडे यांच्‍या चमूने सादर केलेल्‍या देशभक्‍तीपर गीताने झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गलांडे यांनी केले.

मंथन, नागपूर निर्मित, मोहन मदान प्रस्‍तुत व शैलेंद्र कृष्‍णा बागडे दिग्‍दर्शित ‘तथागत’ या महानाट्याचे लेखन किरण बागडे यांनी केले असून संगीत भूपेश सवाई यांचे आहे. कविता कृष्‍णमूर्ती, उदीत नारायण, ओम पुरी व विक्रम गोखले या दिग्‍गज कलाकारांचा पार्श्‍वसर लाभलेल्‍या या महानाट्यात 200 कलाकारांचा समावेश होता. बुद्धकालीन संगीत, रंगभूषा, वेशभूषा, घोडे, रथ महानाट्याचे वैशिष्‍ट्य ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या कथनातून भगवान बुद्धाची कथा उलगडत जाते. तथागताचा राजघराण्‍यात झालेला जन्‍म, जगातल्‍या श्रेष्‍ठ अशा सुखसुविधा, भोगविलास प्राप्‍त होऊन अस्‍वस्‍थ राहणारा राजपूत्र, राजपाटाचा त्‍याग करून ख-या सुखाच्‍या शोधार्थ वनाश्रमात गेलेला गौतमीपूत्र, कठोर परिश्रम, तपश्‍चर्या करूनही हाती काही न लागल्‍याने निराश झालेला मुनी आणि शेवटी अथांग, अनंत अशा विचारातून सत्‍याचा, दु:खाच्‍या कारणांचा शोध लागलेला बुद्ध आणि त्‍यांचे महापरिनिर्वाण असे भगवान बुद्धांच्‍या जीवनातील विविध टप्‍पे या नाटकात दर्शविण्‍यात आले.

बुद्धत्‍व प्राप्‍तीनंतर सामाजात पसरलेली अराजकता, असमानता, अमानवीयता, भेदभाव, हिंसा संपविण्‍यासाठी झटणारा शाक्‍यमुनी आणि मानवतेची, अहिंसेची, ज्ञानाची, विज्ञानवादाची शिकवण देणा-या बौद्ध धम्‍माचा संस्‍थापक तथागत बुद्ध या महानाट्यातून नागपूरकरांना उलगडत गेला. प्रभावी आणि वेगवान मांडणी, कलावंतांचा अभियन आणि त्‍याला लाभलेली गीत, संगीताची साथ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्‍यात यशस्‍वी ठरली. 

कार्यक्रमाला अॅड. सुलेखा कुंभारे, भंते धम्‍मोदय महाथेरो, माजी आ. नानाभाऊ शामकुळे, भूपेश थुलकर, सुरमणी पं. प्रभाकर धाकडे, अनंतराव घारड, व्‍हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे, मेडीकल कॉलेजचे अधिष्‍ठाता डॉ. राज गजभिये, माजी आ. मिलिंद माने, अॅड. धर्मपाल मेश्राम, अरविंद गजभिये, संदीप जाधव, राजेश हातीवेळ, सिद्धार्थ गायकवाड यांची उपस्‍थ‍िती होती. ‘परिनिर्वाण’ या चित्रपटाचे पोस्‍टर व टिझरचे विमोचन करण्‍यात आले. रामदेव वटकर व शैलेंद्र कृष्‍णा यांचा हा चित्रपट आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे.

धाकडे गुरुजींच्‍या व्‍हायोलिन वादनाने रिझवले : राष्‍ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्‍यातीचे व्‍हायोल‍िन वादक सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजीच्‍या सुरमयी व्‍हायोलिन वादनाची मेजवानी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात नागपूरकरांना मिळाली. त्‍यांनी राग यमन ने वादनाला सुरुवात केली. भारतीय घटनेसंबंधीत ‘भारतीय घटनेचा तू शिल्‍पकार आहे’ हे गीत पं. धाकडे गुरुजींनी व्‍हायोलिनच्‍या सुरावटीने सजवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्‍वरसुमनांजली वाहिली. त्‍यांना तबल्‍यावर राम खडसे यांनी तर तानपु-यावर लक्षती काजळकर यांनी साथसंगत केली. पं. धाकडे गुरुजी मागील साठ वर्षांपासून आपल्‍या व्‍हायोलिन वादनाने रसिकांना मंत्रमुग्‍ध करीत असून त्‍यांनी देशविदेशात अनेक शिष्‍य घडवले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *