- Breaking News

नागपुर समाचार : डिजिटल व्यासपीठांद्वारे साहित्य प्रसार अधिक होईल; जिल्हा ग्रंथोत्सवच्या परिसंवादातील सूर

जिल्हा ग्रंथोत्सवच्या परिसंवादातील सूर

नागपुर समाचार : सध्या मोठ्या प्रमाणावर दृकश्राव्य माध्यमांचा प्रसार झाला आहे. त्यामुळे अक्षर साहित्य हे वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांद्वारे नवीन पिढीपर्यंत पोहोचवता येईल, असा सूर आज आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवातील परिसंवादात सहभागी विविध क्षेत्रातील माध्यम प्रतिनिधींनी नोंदवले.

नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग जवळील ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर दृकश्राव्य माध्यमे व हरवलेले अक्षर साहित्य या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे अध्यक्ष विद्यापीठाच्या ललित कला शाखा विभागाचे प्रमुख डॉ. विश्वास इंदुरकर होते तर सहभागी वक्त्यांमध्ये लोकसत्ताची निवासी संपादक देवेंद्र गावंडे, कवयित्री मनीषा अतुल, भंडाऱ्याच्या जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ यांचा सहभाग होता.

पुस्तक वाचणे हा जिवंत अनुभव असून पिढ्यांद्वारे वाचन संस्कृतीचे जतन झालेले आहे. पुस्तक हाती घेऊन, वाचून भावविश्व समृद्ध झालेली एक पिढी आपल्यासमोरून गेली आहे. आता मोठ्या प्रमाणावर संक्रमण अवस्थेतून वाचक व वाचन संस्कृती जात असूनही वाचनाचा वारसा हा पुढील पिढ्यांमध्ये झिरपण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याची गरज असल्याचे मत मनीषा अतुल यांनी व्यक्त केले. 

वाढत्या डिजिटल माध्यमांद्वारे वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार अधिक वेगाने होत असून पारंपारिक मुद्रित माध्यमाच्या जागी युटयुब, फेसबुक, व्टीटर, या समाज माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचवली आहे. परिघ वाढल्याने अक्षर साहित्याला नवसंजीवनी मिळाल्याचे मत शैलजा वाघ यांनी व्यक्त केले. तर केले तर सकस साहित्याची निर्मिती मराठीत झाली पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल झाला पाहिजे. सकस साहित्य निर्मितीची जबाबदारी साहित्यिकांसोबतच शिक्षण व्यवस्थेची देखील असल्याचे मत लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले.

शब्द, शिल्प व नृत्य संगीत ह्या सर्व ललित कलांच्या माध्यमातून निशब्द राहून देखील संवाद साधता येतो. या माध्यमांना शब्दांची गरज नाही. अशाच पद्धतीने अक्षर साहित्य हे अक्षरच राहणार आहे. काळाच्या कोणत्याही प्रवाहात ते लोप पावणार नाही, असे प्रतिपादन ललित कला विभाग प्रमुख डॉ. विश्वास इंदूरकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक जोशना कदम यांनी केले. या परिसंवादाला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, पत्रकार, अभ्यासक, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे व सहायक संचालक ग्रंथालय विभाग मीनाक्षी कांबळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *