- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव, सुप्रसिद्ध गायक हर‍िहरन यांनी नागपूरकरांना जिंकले

सेवावस्‍तीला मुलांचे उत्‍कृष्‍ट सादरीकरण ; खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा दुसरा दिवस 

नागपूर समाचार : ‘रोजा जानेमन’, ‘चंदा रे चंदा रे’, ‘तु ही रे, तु ही रे’ अशी एकाहून एक सुरेल आणि गाजलेली गीते सादर करून सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांनी नागपूरकर रसिकांची मने जिंकली. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या मध्‍य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाच्‍या आज दुस-या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्‍हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर, मनपा आयुक्‍त बी. राधाकृष्‍णन, ज्‍येष्‍ठ उद्योगपती रमेश मंत्री, रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाचे डेप्‍युटी गव्‍हर्नर सतीश मराठी, मनोज बाली यांची व प्रसिद्ध गायक हरिहरन यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते यावेळी हरिहरन व मराठमोळी युवा गायिका आर्या आंबेकर यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

त्‍यानंतर हरिहरन यांनी गणेश स्‍तवनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्‍यांनी ए. आर. रहेमान यांनी संगीतबद्ध केलेले ‘रोजा’ चित्रपटातील ‘रोजा जानेमन’ व ‘1947 अर्थ’ चित्रपटातील ‘भिनी भिनी खुशबू है तेरा बदन’ ही गीते सादर केली. त्‍यानंतर आर्या आंबेकर मंचावर आली. ‘नागपूर हे माझे जन्‍मगाव असल्‍यामुळे मला नेहमीच येथे सादरीकरण करताना आनंद होतो’, असे ती म्‍हणाली.

हरिहरन व आर्या यांनी ‘बाहों के दरमियॉं’ आणि ‘चंदा रे चंदा रे’ ही गीते सादर करीत मोठ्या संख्‍येने उपस्‍थि‍त श्रोत्‍यांच्‍या टाळ्या घेतल्‍या. आर्यासोबत ‘जीव दंगला, गुंगला, रंगला हा असा’ हे मराठी गीत हरिहरन यांनी सादर केले त्‍यानंतर आर्याने काही सोलो गीते सादर केली. हर‍िहरन यांचा मुलगा अक्षय याच्‍यासोबतही त्‍यांनी काही गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे. 

सेवावस्‍तीतील मुलांचे गडकरींनी केले कौतुक : रस्‍त्‍यावर कचरा उचलणा-या, झोपडपट्टी राहणा-या मुलांनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला. खुशाल व उषा ढाक यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे म्‍हणत नितीन गडकरी यांनी सेवावस्‍तीतील मुलांचे व त्‍यांच्‍या शिक्षकांचे कौतुक केले. हरिहरन, अमीत त्रिवेदी यासारख्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील कलाकारांसोबत स्‍थानिक कलाकारांनाही सांस्‍कृतिक महोत्‍सवात संधी देण्‍यात आली आहे, असे नितीन गडकरी यावेळी म्‍हणाले. 

जीवन एक आशा… 

रस्‍त्‍यांवर कचरा वेचणारे, झोपडपट्टीतील जीवन जगणारी मुले, त्‍यांना होणा-या शारीरिक, मानसिक यातना, शिक्षणाच्‍या अभावामुळे व‍िखुरलेल्‍या आयुष्‍य. अशातच त्‍यांना एक आशेचा किरण भेटतो आणि या मुलांना शिक्षण देत, त्‍यांच्‍यातील प्रतिभेला पैलू पाडत त्‍यांचे जीवन घडवतो. त्‍यांच्‍या आयुष्‍यात आनंद, सुखाचे क्षण घेऊन येतो. कचरा वेचणा-या, भीक मागणा-या मुलांसाठी काम करणारे खुशाल व उषा ढाक या दाम्‍पत्‍याच्‍या जीवनावर आधारित ‘तारे जमीं पर’ हे लघुनाट्य सेवावस्‍ती निवासी मुलांनी सादर केले. सेवासर्वदा बहुउद्देशीय संस्‍थेचे संचालक व झोपडपट्टीतील मुलांच्‍या शिक्षणासाठी कार्य करणारे खुशाल व उषा ढाक यांचा यावेळी नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. 

खुशाल ढाक म्‍हणाले, नितीन गडकरी यांच्‍या रूपाने आपल्‍याला सूर्य लाभला आहे. श्री. नितीन गडकरी व कांचनताई गडकरी यांच्‍या प्रेरणेमुळेच 422 झोपडपट्टीतील मुलांसाठी काम करणे शक्य झाले. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात मुलांच्‍या प्रतिभा सादर करण्‍याची संधी दिल्‍याबद्दल खुशाल ढाक यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले. सुरुवातीला सुप्रसिद्ध गायक श्‍याम देशपांडे यांच्‍या नेतृत्‍वातील 50 महिलांच्‍या समूहाने ‘चंदन है इस देश की माटी, बच्‍चा बच्‍चा राम है’, ‘जय भारत वंदे मातरम’ ही देशभक्‍तीपर गीते सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *