- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपूर समाचार : श्रीचक्रधर स्वामींच्या मानवतावादी कार्याची माहिती जनतेला व्हावी

अष्टशताब्दीनिमित्त राज्यपालांकडून शुभेच्छा

नागपूर समाचार ता. २७ : महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या मानवतावादी कार्याची माहिती जनतेला व्हावी, या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे विचार महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांनी श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केले आहेत.

राजभवनातर्फे प्रसिद्ध झालेल्या पत्रकात राज्यपाल म्हणतात, महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या अवतार कार्याला दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी ८०० वर्षे पूर्ण होत आहे. हे समजून अतिशय आनंद झाला. श्रीचक्रधर स्वामींची अष्टशताब्दी संपूर्ण महाराष्ट्राकरिता व जगभरातील मराठी भाषिकांकरिता गौरवपूर्ण घटना आहे.

श्रीचक्रधर स्वामींनी समाजाला सत्य, अहिंसा, मानवता व समानता ही मूल्ये दिली. ‘महाराष्ट्र म्हणजे, महंत राष्ट्र’ अशी ‘महाराष्ट्रा’ची थोरवी त्यांनी १२ व्या शतकात सांगितली आहे. त्यांनी मराठीला देववाणीचा दर्जा देऊन राजसिंहासनावर बसविले. त्यांचे संपूर्ण चरित्र ‘लीळाचरित्र’ या मराठी आद्यग्रंथात आढळते. गेल्या ८०० वर्षांपासून मराठी साहित्यात महानुभावांचे योगदान फार मोठे आहे.

आज महाराष्ट्रात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात महानुभाव उपासक आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींचे तत्त्वज्ञान, साहित्य आणि सामाजिक योगदान अलौकिक असे आहे. राज्यातील आणि देशातील सर्व जनतेला आणि विशेषतः युवा पिढीला श्री चक्रधर स्वामींच्या मानवतावादी कार्याची माहिती व्हावी, या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

श्रीचक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मी कोटी कोटी वंदन करतो, असा संदेश राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांनी शुभेच्छापत्राद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *