- नागपुर समाचार, मनपा

तीन महिन्यात करा रस्ता पूर्ण : न्यायालय पाच वर्ष उलटली रस्ता अद्याप जसा चा तसाच!

तीन महिन्यात करा रस्ता पूर्ण : न्यायालय

पाच वर्ष उलटली रस्ता अद्याप जसा चा तसाच!

माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या घरासमोरील जुना भंडारा रस्त्याची झाली चाळण

संपूर्ण शहरात बांधले सिमेंट रस्ते,या रस्त्याच्या भाग्यात डांबरी रस्ता ही नाही

रस्ता झाला ’राजकीय’:राजकारण्यांची घरे जाणार म्हणून जनतेचे हाल, राजकारणी खुशहाल!

केक कापून नागरिकांनी साजरा केला न्यायालयीन निर्णय दिनांकाचा आगळा-वेगळा सोहळा

नागपूर,ता.१९ जुलै २०२२: जुना भंडारा रोड, मेयो हाॅस्पीटल ते सूनील हाॅटेल डीपी रोड,या ६० फुटांचा नॅशनल हायवे रोड क्रमांक ६ च्या संदर्भात १९ जूलै २०१७ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक आदेश दिला होता, नागपूरकरांच्या सुविधेसाठी,अक्षरश: चाळण झालेल्या या रस्त्याच्या कामाची सुरवात येत्या तीन महिन्यात करावी मात्र आज १९ जुलै २०२२ उजाडला तरी देखील न्यायालयाच्या या आदेशाचे पालन झालेच नाही,परिणामी मध्य नागपूर विकास आघाडीतर्फे न्यायालयीन निर्णय दिनांकाचा आज १९ जुलै रोजी आगळा-वेगळा सोहळा या रस्त्यावर केक कापून साजरा करण्यात आला.

या रस्त्यासाठी गेल्या अनेक वर्षात बरेच ’राजकारण’झाले कारण या रस्त्यामुळे काही राजकारण्यांची घरे प्रभावित होणार होती,एकीकडे संपूर्ण नागपूर शहरात सिमेंट रस्त्यांच्या बांधकामांचा धडाका सुरु असताना या एवढ्या वर्दळीच्या रस्त्याच्या नशीबी, न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील का बदल घडून येऊ शकला नाही,यातच सगळे ‘गुपित’ आहे, जनतेच्या सुविधेपेक्षा रस्ताच ‘राजकीय‘ करुन टाकण्यात आला,असा संताप या भागातील नागरिक उघडपणे व्यक्त करतात.

नुकतेच एका कार्यक्रमात शहराचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी उघडपणे, मिश्‍किलतेने मान्य केले, की त्यांच्या महाल येथील घरासमोरील केळीबाग रस्ता व हा जुना भंडारा मार्ग या दोन रस्त्यांची कामे, ही तर त्यांच्याही अवाक्या बाहेरील झाली आहे!

उच्च न्यायालयाचा आदेश होता की ३ महिन्यात काम सुरू करा पंरतू दुर्दैवाने तीन महिनेच काय, तर गेल्या २३ वर्षांपासून या रस्त्याच्या नशीबी ठिकठिकाणी उखडलेले डांबर,दर एका सेंटीमीटर परिघातात असणारे लहान-मोठे खड्डे हेच प्राक्तन आले आहे. दिनांक ७ जानेवरी २००० रोजी नागपुरातील ४५ डीपी रोड मंजूर झाले होते,यातील ४४ कामे पूर्ण होऊन दशके ही लोटली फक्त या ‘एकाच’ रस्त्याचे म्हणजे या जुन्या भंडारा रोडचे काम गेल्या २३ वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे!प्रकल्पात असल्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरण देखील होऊ शकले नाही,हे विशेष!

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहिद चौक इतवारी नागपूर येथे आपल्या निवडणुकीत प्रचार भाषणात वचन दिले होते, जुना भंडारा रोडसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून दिला जाईल परंतु दुर्दैवाने त्यांच्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात तो निधी कुठे अडकला,याचा शोध आता या रस्त्यावरुन जाणे-येणे करणारे व दररोज मरणयातना साहणारे वाहन चालक मुखातून निघणा-या ‘मंत्रस्त्रोताद्वारे’दररोज घेत आहेत!

 

या संपूर्ण रस्त्यावर एक सेंटीमीटरचा बिना खड्डयांचा शाबूत रस्ता दाखवा व बक्षीस जिंका,अशी पैज देखील येथील नागरिक गमतीने लावताना आढळतात.

आता फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले असून राज्याची सत्ता त्यांच्या हातात आहे.त्यांनी आता राज्याच्या या उपराजधानीतील, गेल्या २३ वर्षांपासून ‘राजकारणींच्या घराच्या राजकारणात’ अडकलेला रस्ता त्वरित निधी उपलब्ध करुन बांधावा व नागपूर ‘स्मार्ट सिटी’ हे स्लोगन परिपूर्ण करुन, आपल्या जन्म व कर्मभूमीच्या शहरातील नागरिकांना मोठा दिलासा द्यावा अशी मागणी मध्य नागपूर विकास आघाडीतर्फे ,जनहितार्थ, भूषण दडवे व रविंद्र पैगवार यांनी केली आहे.

या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे व विद्यमान आयुक्त राधाकृष्णन. बी यांनी शासनाकडे लेखी पत्र पाठवून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या अक्षरश: चाळण झालेल्या रस्त्याचा श्‍वास मोकळा करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे आता या रस्त्याच्या संदर्भातली जवाबदारी, आमदार प्रवीण दटके यांच्याकडे त्यांनी सोपवली आहे.परिणामी आ.विकास कुंभारे व आ. कृष्णा खोपडे यांनी मंजूर झालेल्या या रस्त्याच्या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिमागे लागून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मध्य नागपूर येथील जनतेतर्फे करण्यात आली आहे.

या रस्त्याचे भाग्य उजळणा-या उच्च न्यायालयाच्या आदेशालाही आज ५ वर्षे म्हणजे ६० महिने पूर्ण झाले ,या पार्श्वभूमीवर हा न्यायालयीन निर्णय दिनांक वर्धापन सोहळा, केक कापून व मेणबत्त्या लावून साजरा करण्यात आला .या प्रसंगी मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष व या रस्त्यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढा देणारे जनहित याचिकाकर्ता भूषण दडवे ,माजी स्थायी समिती मनपा अध्यक्ष रविंद्र पैगवार ,माजी नगरसेवक रमण पैगवार,बंडु पारवे,शिव चौरीया तसेच मोठ्या संख्येने मध्य नागपूर विकास आघाडीचे कार्यकर्ते व येथील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.