- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शेतकऱ्यांचे पुतळे उभारून श्रमशक्तीचा राज्यात सन्मान करू या : ना. सुनील केदार 

फेटरी येथे ‘देशाचा पोशिंदा शेतकरी’ पुतळ्याचे अनावरण

नागपूर समाचार : स्वातंत्र्याचा लढा असो वा दुष्काळ, कोरोना सारखी महामारी असो वा देशावर आक्रमण. सामान्यांच्या पोटाची भूक भागवणारा एक कारखाना या देशातील श्रमशक्ती अर्थात शेतकरी सदैव चालवीत असतो. या श्रमशक्तीचा सन्मान करण्याचे महान कार्य फेटरी येथील जनतेने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय,युवक व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

महाराष्ट्रात सर्व ठिकाणी या श्रमशक्तीचा सन्मान म्हणून शेतकऱ्यांचे पुतळे उभे राहिले पाहिजे,असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

स्वातंत्र्य संग्रामात शेतकऱ्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. देशभक्तीने प्रेरित होऊन अनेक शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यासोबत देशाला अन्न धान्याचा पुरवठा नियमित चालू ठेवला. कोरोना महामारीच्या काळात सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले असतांना शेतकऱ्यांचा व्यवसाय नियमित होता. अशा शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. असेच पुतळे राज्यातही उभारुन शेतकऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले. .

मंत्री सुनील केदार यांच्या प्रेरणेतून ‘देशाचा पोशिंदा शेतकरी’ हा पुतळा ग्रामपंचायत फेटरी येथे उभारण्यातआला. या पुतळ्याचे अनावरण आज त्यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. कृष्णा इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायंन्स, कराडचे कुलगुरु वेदप्रकाश मिश्रा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी मंत्री रमेश बंग, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, नागपूर (ग्रामीण) पंचायत समितीच्या सभापती रेखा वर्टी, जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, ममता धोपटे, दिनेश बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, पंचायत समिती सदस्य रुपाली मनोहर, प्रिती अखंड, माहुरझरीचे सरपंच संजय कुंटे यावेळी उपस्थित होते.

देशाची आर्थिक घडी बसविण्यात शेतकऱ्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने हा देश उभा केला आहे. या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना मानाचे स्थान मिळावे हा यामागचा उद्देश असल्याचे श्री. केदार म्हणाले

सुनील केदार यांच्या प्रेरणेतून उभारण्यात आलेला शेतकरी पुतळा राज्यातील पहिला प्रयोग असावा, असे कृष्णा इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायंन्स, कराडचे कुलगुरु वेदप्रकाश मिश्रा यांनी सांगितले. कष्टकरी व सेवाभावी शेतकऱ्यांचा पुतळा येथे उभारण्यात आला. याबाबत शेतकरी वर्गात अभिमानाची बाब असून एक नवचैतन्य त्यांच्यात निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

1971 च्या लढ्यात माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ चा नारा देवून देशभक्तीची भावना देशवासियांच्या मनात रुजविली होती, त्यांचे स्मरण यावेळी होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीची वाट मिळून प्रेरणा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत व मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेटरीचे सरपंच धनश्री ढोमणे यांनी केले. या कार्यक्रमास परिसरातील सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.