नागपूर समाचार : शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाइन लॉटरीच्या अवैध व्यवसायावर गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने मोठी कारवाई केली आहे. लालगंज येथील चकणा चौक परिसरात टाकलेल्या छाप्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागरिकांकडून पैसे घेऊन शासनाने प्रतिबंधित केलेल्या ऑनलाइन लॉटरीवर सट्टा लावण्याचा व्यवसाय करत होते. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून चार संगणक, चार सीपीयू, सात गेमिंग मशीन, दोन स्लिप मशीन, दोन मोबाईल फोन, राऊटर, कीबोर्ड, कॅल्क्युलेटर तसेच इतर साहित्य असा सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख सचिन दिलीप रहागडाले आणि अनिकेत मोरेश्वर वाकुळकर अशी आहे. तर सागर लीलाधर धनंजोडे हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.




