नागपूर जिल्ह्यात वाडी पोलीस स्टेशन हद्दीत अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे पकडले
नागपूर समाचार : कृषि विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर योगेश डबरासे वय ३७ वर्ष, वाडी, नागपूर आणि समीर काकडे वय ३१ वर्ष वाहनचालक, वाडी, नागपूर हे एमएच 40 एके 1147 या पिकअप व्हॅनने नागपूर वाडी क्षेत्रात बोगस कापूस बियाणेची अवैध वाहतूक करीत असतांना पोलीस स्टेशन वाडीचे पथक आणि नागपूर कृषि विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाने पकडले.
आरोपी कडून विजया, माउली , तिलक, गैलक्सी हायपर, आरकॉट इ. नावाने बोगस एचटीबीटी कापूस बियाणे १६ गोण्या वाहतूक करतांना रंगेहाथ पकडले. या पोत्यामध्ये रु.७.१९ लाख रकमेचे बनावट कापूस बियाणे ७९८ पाकिटे आढळून आली आणि रु. १.५० लाख किमतीचे पिकअप व्हॅन जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण सुनील बोरकर, विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, गुण नियंत्रण निरीक्षक तथा तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संदीप पवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषि विकास अधिकारी तथा भरारी पथकाचे पथक प्रमुख व मोहीम अधिकारी समाधान धूळधुळे यांचे मार्गदर्शनाखाली नागपूर तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी रमा बनकर, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाईत, नागपूर तालुक्याच्या गुण नियंत्रण निरीक्षक रिना डोंगरे, पंचायत समितीच्या गुण नियंत्रण निरीक्षक गीतांजली नांदूरकर यांचे उपस्थितीत वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमित बंडगर, पोलीस हवालदार राहुल बोटरे, रोशन फुकट, विनोद कुंभलकर यांनी कारवाई केली.
बियाणे कायदा 1966 चे कलम 7 (a) 7(d) 19, बियाणे नियंत्रण आदेश 1983, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 व नियम 2010 चे 10 सहकलम 1,2,3,4 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलमांचे उल्लंघन केल्याने यांचे विरुद्ध वाडी पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस तपास सुरू आहे.




