- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : सामाजिक न्याय विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती द्या – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

शासकीय वसतिगृहांमधील अन्नधान्य व जेवणाची तालुका पातळीवर तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून होणार पाहणी

नागपूर समाचार : सामाजिक न्याय विभागांतर्गत ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्यांचा पात्र लाभार्थ्यांना जो लाभ दिला जातो त्याची माहिती त्या संबंधित लाभार्थ्यांना संदेशाद्वारे दिली गेली पाहिजे. या संवादातून संबंधित योजनेवरचा लाभार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण होतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध विषयांवरील आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अॅट्रासिटी अंतर्गत जिल्ह्यात जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचा अधिक तत्पर तपास करुन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत पण चार्जशिट दाखल नाही अशा गुन्हेगारांवर त्वरीत चार्जशिट तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित पोलीस विभागाला दिले. याचबरोबर शासनाने अशा बाधीत कुटुंबाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने, त्यांना धैर्य देण्याच्या उद्देशाने शासकीय सेवेत घेण्याची जी संधी दिली आहे त्यासाठी त्यांचे योग्य वारसदार यांना पडताळून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

जिल्ह्यात 6 प्रकरणांमध्ये 3 प्रकरणे हे योग्य वारसदार नसल्याने अपात्र झाली आहेत. याची कायदेशीर शहानिशा करण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी समाज कल्याण विभागाला केल्या.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत त्यांनी बैठकीत आढावा घेतला. शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना जे अन्न दिले जाते ते तालुक्याच्या तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत तपासून घेणे आवश्यक आहे. यातून कंत्राटदारावर जबाबदारी येईल. याचबरोबर पुढील शैक्षणिक वर्ष येत्या जून पासून सुरु होत असून त्यांच्या आरोग्याची तपासणी वेळेत करुन घेण्यास त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांना निर्देश दिले. या बैठकीत तृतीयपंथी यांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवासुविधांबाबत आढावा घेण्यात आला. संबंधित विभाग प्रमुखांसमवेत लवकरच एक व्यापक बैठक घेऊन त्यांच्या विविध प्रश्नांना मार्गी लावू असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.