- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील गंभीर गैर व्यवस्थे विरोधात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा घेराव

मागणी: डागा रुग्णालयात तातडीने पोलीस चौकी स्थापन करावी आणि परिसरात पोलीस गस्त वाढवावी

नागपूर समाचार : नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या गंभीर गैरव्यवस्था आणि रुग्णांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाविरोधात आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला.

घटनेची पार्श्वभूमी

रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या आयसीयूमध्ये १४ मे रोजी, गुरुवारी धूर पसरल्याची घटना घडली. वेळीच लक्ष दिल्याने ३८ लहान बालकांचे प्राण वाचले, मात्र या घटने रुग्णालयातील सुरक्षा आणि देखभालीच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पुर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लता बाल मुकुंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप मडावी यांच्याकडे निवेदन सादर केले. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या ठाणे येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून महाराष्ट्र राज्य प्रमुख राम हरी राऊत यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन लहान बालकांच्या प्रकृतीची चौकशी केली.

रुग्णालयातील प्रमुख समस्या

१. स्वच्छता व पाणीपुरवठा

  • संपूर्ण रुग्णालयात अस्वच्छता असून नियमित साफसफाई होत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरून संसर्गाचा धोका वाढला आहे.
  • पिण्याच्या पाण्यासाठी बसवले आरओ प्लांट बंद अवस्थेत आहेत. संपूर्ण रुग्णालयात फक्त एकच आरओ सुरू आहे. 
  • वार्डाबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या कॅन रिकाम्या असतात. रुग्ण आणि नातेवाईकांना अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे.
  • अस्वच्छता करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका तातडीने रद्द करावा.

२. औषध व उपचार व्यवस्था

  • डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे रुग्णांना बाहेरून आणावी लागतात. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.
  • रुग्णालयातच सर्व औषधांची उपलब्धता करावी अशी मागणी करण्यात आली.

३. कर्मचाऱ्यांचे वर्तन व मनुष्यबळाचा अभाव

  • प्रसूतीसाठी आलेल्या महिलांशी डॉक्टर आणि नर्सेस यांचे वर्तन असभ्य असल्याच्या तक्रारी आहेत. नातेवाईकांनी विचारणा केल्यासही गैरवर्तन केले जाते.
  • रेडिओलॉजी विभागात फक्त एकच तंत्रज्ञ कार्यरत आहे. दुसऱ्या तंत्रज्ञाने राजीनामा दिला आहे.
  • डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे.

४. सुरक्षा व पायाभूत सुविधा

  • मेट्रोच्या कामामुळे रुग्णालयाचा जुना प्रवेशद्वार तोडण्यात आला, मात्र नवीन गेट अद्यापही बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे बाहेरील अनोळखी व्यक्ती रुग्णालय परिसरात येऊन दारू, गांजा पितात आणि गुटखा खाऊन परिसर खराब करतात.
  • रुग्णालयात पोलीस चौकी नसून तहसील पोलीस स्टेशनकडूनही नियमित गस्त होत नाही.
  • नवीन इमारतीसाठी शासनाने २१ कोटी रुपयांपैकी फक्त १४ कोटी रुपये दिले असून ७ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. निधीअभावी काम अर्धवट राहून ठेकेदाराने काम बंद केले आहे.
  • मेट्रो उड्डाणपुलासाठी रुग्णालयाची सुमारे एकर जागा घेतली गेली, मात्र त्याचा मोबदला केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेला नाही.

प्रमुख मागण्यां

  • रुग्णांना रुग्णालयातच मोफत औषधांचा पुरवठा करावा.  
  • रुग्ण आणि नातेवाईकांशी सभ्य व संवेदनशीलपणे वागण्याचे आदेश डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांना द्यावेत.  
  • आरओ मशीनद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा तातडीने प्रत्येक वार्डात उपलब्ध करावी.  
  • स्वच्छतेचा ठेका रद्द करून जबाबदार एजन्सी नेमावी.  
  • रुग्णालयाला तातडीने नवीन प्रवेशद्वार बांधून द्यावे आणि सुरक्षा वाढवावी.  
  • प्रलंबित ७ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा.

या वेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा, शहर संपर्क प्रमुख रमेश डोके, ग्रामीण संपर्क प्रमुख महेंद्र भुरे, नागपूर शहर व ग्रामीण जिल्हा समन्वयक सुशील हातीथेले, शहर जिल्हा समन्वयक डॉ. वलिऊन रहमान, ग्रामीण जिल्हा समन्वयक रमेश कन्हेरे, उपजिल्हाप्रमुख राहुल चांडक, शहर प्रमुख विवेक दस्तुरे, जगदीश गुप्ता, कपूर सिंग, मध्य नागपूर विधानसभा संघटक निशांत वासाणी, कामठी विधानसभा संघटक संतोष समुद्रे, हिंगणा विधानसभा रुग्णसेवक सोनू कश्यप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने इशारा दिला आहे की, रुग्णांच्या हिताच्या या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.