- Breaking News, क्राईम खबर , नागपुर समाचार

नागपूर समाचार : कृषि विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाची मोठी कारवाई; ५२ लाखाचा मुद्देमाल व वाहतूक करणारा ट्रक जप्त

अनधिकृत विना परवाना संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे पकडले

नागपूर समाचार : जिल्हा कृषि विभागाच्या भरारी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर संतोष राय यांचे मालकीचे ऑकट्राय फ्री झोन, गोडाऊन नंबर 22/2, वर्धमान नगर, नागपूर येथे दि. 13.05.2026 रोजी धाड टाकून सुकून या नावाने संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे अशोक लिलँड कंपनीच्या एमएच-40 एके-3993 या ट्रक मधून 58 प्लास्टिक बैग उतरवीत असतांना गुण नियंत्रण भरारी पथक आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाईत रंगेहाथ पकडले.

पकडलेल्या प्लास्टिक पोत्यामध्ये सुकून सीड्स प्रा.लि. अहमदाबाद या कंपनीचे सुकून 15 बीजी II लॉट नंबर 6030 (1991) या विवरणाचे संशयास्पद कापूस बियाणे एकूण 2907 पाकिटे प्रती पाकीट 475 ग्राम प्रमाणे एकूण 13.80 क्विंटल मुल्य रु. 26.19 लाख (अक्षरी सव्वीस लाख एकोणवीस हजार दोनशे सात रुपये) बनावट कापूस बियाणाचा साठा जप्त केला.

सोबतच अनधिकृत बियाणे वाहतूक करणारे ट्रकची अंदाजे किंमत रु. 25 लाख असा एकूण 51.19 लाख रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण सुनील बोरकर, विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, गुण नियंत्रण निरीक्षक तथा तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संदीप पवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषि विकास अधिकारी तथा भरारी पथकाचे पथक प्रमुख व मोहीम अधिकारी समाधान धूळधुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस तपास सुरू आहे.

“एचटीबीटी कापूस बियाण्यांना केंद्र सरकार किंवा GEAC कडून कोणतीही व्यावसायिक परवानगी नाही. अशा बियाण्यांमुळे पर्यावरण, जैवविविधता, मातीची सुपीकता आणि अन्नसुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो,” असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी सांगितले.