जुन्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने समझोत्यासाठी दावेदारांचा वाढता कल
३२ कोटी ३ लाख रुपयांचा एकूण समझोता
१० कोटी १५ लाख रुपयांची कर्ज वसुली
मोटर अपघात दावा प्राधिकरणांमध्ये ११ कोटी १८ लाख २७ हजार रुपयांचा समझोता
नागपूर समाचार : जिल्हा न्यायालय, नागपूर, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसूली न्यायाधीकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय आणि जिल्हयातील सर्व तालूका न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये व नागपुर जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यशस्वी झाले. या लोक अदालतीला जिल्हयातील नागरिक व पक्षकारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. सुराणा यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित प्रकरणापैकी १०११ व दाखलपुर्व प्रकरणापैकी ५१३८ प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. जिल्हयातील सर्व फौजदारी न्यायालयांमध्ये दिनांक ०४/०५/२०२६ ते ०८/०५/२०२६ या कालावधीमध्ये विशेष अभियान राबवून फौजदारी प्रकिया संहिता, १९७३ चे कलम २५६ व २५८ (कलम २७९ व २८१ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३) अन्वये एकूण २३२३ निरस्त फौजदारी प्रकरणे देखील निकाली काढण्यात आली.
या लोकअदालतमध्ये एक वर्ष कालावधीच्या आत पक्षकारांना न्याय मिळून दोन्ही पक्ष समाधानाने घरी गेले. शुभम विजयकुमार मेश्राम हे स्टेट बँक ऑफ इंडीया येथे कार्यरत होते. ते दि.२३/०३/२०२५ बसने प्रवास करीत असताना त्यांचा रमनपुर घाटाजवळ, मझर, मध्य प्रदेश येथे अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने मोटर अपघात दावा दाखल केला होता. सदर प्रकरण आज लोक अदालतीमध्ये पॅनल क.२ न्यायाधीश ए.एच. सैयद यांच्या समक्ष ठेवण्यात आले होते. या प्रकरणात रुपये १,कोटी ५ लाख मयताच्या वारसांना मंजूर करण्यात आले.
आजच्या लोक अदालतीमध्ये दुसऱ्या प्रकरणात श्रीमती सुनिता शिवहरे यांनी जय श्री साई बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स यांना जमीण विकली होती. त्यापोटी त्यांना मिळालेले ४ धनादेश न वटता परत आल्याने त्यांनी न्यायालयात श्री साई बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स विरुध्द पराकम्य लेख अधिनियम कलम १३८ अंतर्गत चार खटले दाखल केले होते. आज ही संक्षिप्त केस पॅनल क १४ येथे न्यायाधीश बी.व्ही. बुरांडे यांच्या समक्ष ठेवण्यात आले. दोन्ही पक्षांना समज देवून त्यांच्यामध्ये तडजोड घडवून आणली व चारही प्रकारणामध्ये रु.२ कोटी १५ लाख रुपयामध्ये मध्ये समझोता होवून प्रकरणे निकाली काढण्यात आले.
लोक अदालतीमध्ये अनेक जुने प्रकरणे जसे की वाटपाची दावे, भु-संपादन प्रकरणे, दिवाणी दावे, धनादेश अनादराचे फौजदारी प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी, प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे, मोटार वाहन कायदयाअंतर्गत प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश आर.एम. सदराणी, न्यायाधीश एम. आर. पुरवार, तसेच मोटार अपघात दावा प्राधिकरणाचे सदस्य पी.बी. नाईकवाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरचे सचिव प्रविन एम. उन्हाळे, नागपूर जिल्हयातील सर्व न्यायिक अधिकारी, पॅनल सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वर्ग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता अथक परिश्रम घेतले. नागपूर जिल्हा न्यायालयीन वकील संघाचे अध्यक्ष व वकीलांनी देखील लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.




