- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

नागपूर समाचार : आपल्या राज्यामध्ये देशी खेळ प्रचंड लोकप्रिय आहेत. राज्यातील ग्रामीण व शहरी या दोन्ही विभागामध्ये कबड्डी हा खेळ खेळला जातो. त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावा गावामध्ये या खेळाची लोकप्रियता प्रचंड असून ती दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात होणारी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मनपा क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.

30 एप्रिल ते ४ मे या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. १६ पुरुष व १६ महिला असे एकूण ३२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे आयोजन उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा. नागपूर विभाग, नागपूर व ऍमॅच्युअर असोसिएशन ऑफ कबड्डी तसेच नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून स्पर्धा कालावधी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी स्पर्धास्थळी भेट देणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान तब्बल १९ वर्षांनी नागपूर जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. स्पर्धा उच्च दर्जाची व भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. नागपूर येथे आयोजित करण्यात येणारी ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा क्रीडाक्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.