गडचिरोली/नागपूर समाचार : नागपूर येथे झालेल्या एका महत्त्वपूर्ण सदिच्छा भेटीत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा नवा संकल्प दृढ करण्यात आला. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार मायाताई ईवनाते यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या प्रसंगी मा.खा. डॉ. नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन मायाताईंचा सन्मान करत त्यांच्या यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी,आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा झाली. आदिवासी बांधवांच्या दैनंदिन अडचणी, शैक्षणिक संधी, आरोग्य सेवा, रोजगार निर्मिती तसेच सामाजिक व राजकीय सक्षमीकरण या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. समाजाच्या प्रगतीसाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
संवादादरम्यान “समाजहितासाठी एकत्रितपणे काम करणे हीच आजची खरी गरज आहे,” असे मत मायाताई ईवनाते यांनी व्यक्त करत, डॉ. नेते यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर डॉ. नेते यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आदिवासी समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास दिला.
हसतमुख आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या भेटीतून भविष्यात विकासाची नवी दिशा निश्चित होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेश सोशल मीडिया प्रमुख अक्षय उईके, सामाजिक कार्यकर्ते रंजित भाऊ आळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ही सदिच्छा भेट केवळ औपचारिक न ठरता, आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी नव्या विचारांची आणि ठोस कृतीची दिशा देणारी ठरली, अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली.




