वर्धा समाचार : भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम आश्रम, बापुकुटीला आज भेट दिली. आदी निवास, बा कुटी, बापुकुटी, बापुंचे कार्यालयाची पाहणी करीत त्यांनी माहिती जाणून घेतली. प्रार्थना सभेत सहभाग घेतला व वृक्षारोपण केले. तसेच सूत कताई केली. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी व मान्यवर उपस्थित होते. ही भेट यावेळी उपस्थित आश्रमवासी यांना भारावून गेली. कारण राष्ट्रपती मुर्मू यांचा वागण्यातील साधेपणा. छोटे छोटे प्रश्न विचारून त्यांनी सर्व विचारपूस केली.

हा चिमटा कशाला?
राष्ट्रपती मुर्मू यांनी महात्मा गांधी यांच्या येथील वास्तव्याच्या सर्व खुणा तपासल्या. येथे जतन करण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूची माहिती घेतली. एका कोपऱ्यात त्यांना एक चिमटा दिसला. हा चिमटा कशासाठी आहे, याबद्दल त्यांनी कुतूहलाने विचारपूस केली. त्यावर त्यांना सांगण्यात आले की गांधीजींच्या काळात या परिसरात खूप साप असायचे. मात्र, त्यांना मारू नका, अशी गांधीजींची सूचना होती. त्यामुळे कार्यकर्ते या चिमट्याच्या सहाय्याने साप पकडून टोपलीत ठेवत आणि नंतर त्यांना जंगलात सोडून देत. अशा प्रकारे अहिंसेचे तत्त्व पाळले जात असे. राष्ट्रपती मुर्मू यांनी ही बाब कौतुकाने लक्षात ठेवली.

फलक वाचन
या सेवाग्राम आश्रम भेटीत श्रीमती मुर्मू यांनी विविध कुट्या आवर्जून न्याहाळल्या. विशेष म्हणजे या ठिकाणी लावलेल्या माहितीपर प्रत्येक पाटी व फलकाचे त्यांनी वाचन केले. बडा पाहुणा आला की त्यास वेळ नसतो, म्हणून वाचन शक्य होत नाही. पण मॅडमने या सर्व सूचना वाचल्यात, अशी प्रतिक्रिया आश्रमचे विजय तांबे यांनी दिली. तेच राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत माहिती देण्यासाठी होते. प्रत्येक कुटीत प्रवेश करण्यापूर्वी मॅडम या आपले शूज काढून ठेवत. त्यांच्यासाठी आणलेल्या बांबूच्या चपला घालून त्या फिरल्या. यावेळी त्यांनी बापू वापरत असलेला हॉटलाईन फोन बाबत विशेष चौकशी केली.
वृक्षारोपण केले
येथे येणाऱ्या विशेष पाहुण्यांच्या हस्ते आश्रम परिसरात वृक्षारोपण केल्या जाते. सर्व तयारी करून ठेवण्यात आली होती. रोप कोणत्या झाडाचे लावणार ते पण निश्चित. राष्ट्रपती यांना केवळ पाणी टाकायचे होते. त्या रोप पाहून लगेच म्हणाल्या की ‘अरे हे तर बेलाचे झाड ना? खूप उपयुक्त आहे’. राष्ट्रपती महोदया अशी अचूक माहिती ठेवतात, तेव्हा त्यांना वृक्षवल्लीबाबत सखोल जाण असावी, अशी उपस्थितांना वाटले. तसेच हा शांत व स्वच्छ परिसर पाहून त्यांना आनंद झाला. चरख्यावर त्यांनी सूत कताई पण करून पाहली. तसेच जाता जाता म्हणाल्या की तुम्ही खूप छान मेंटेन केला हा परिसर. पुढेही जपा. तसेच त्यांनी कुटीवर असलेली जुनी कवेलू याबद्दल पण आश्चर्य व्यक्त केले.




