इंदोरा बुद्ध विहार, संविधान चौक, विमानतळ परिसरात अभिवादन
नागपूर समाचार : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दीक्षाभूमी येथील तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन केल्यानंतर
भिक्खु संघाने बाबासाहेबांचा जयघोष केला. याप्रसंगी स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले, एन.आर. सुटे, आनंद फुललेले, प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर उपस्थित होत्या.

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, भिक्खु, भिक्खुनी संघ आणि अखिल भारतीय धम्म सेना यांच्या संयुक्त वतीने भदंत ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमी येथे बुद्ध वंदना घेण्यात आली.
अनुयायांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बुध्द, धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती निष्ठा व्यक्त केली. यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित भिक्खु संघाने बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन केले.
भदंत ससाई यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी भदंत ससाई यांनी इंदोरा बुद्ध विहार, इंदोरा चौक, संविधान चौक आणि विमानतळ परिसरातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी भंते नागसेन,धम्मविजय, नागानंद, नागवंश, महानागा, कश्यप, अश्वजित, बुध्दघोष, धम्मप्रकाश, संघ, शांतीनागा,धम्मशील, धम्मदीप तसेच भिक्खुनी कुंडलिका, अनोमा, चित्ताबोधी, धम्मानंद, सुमेधा, बोधीआर्या, सुपवासा, करुणादीप, शीलानंद आणि विशाखा यांनीही उपस्थित राहून धम्मकार्याची अखंड परंपरा पुढे नेली. धम्मसेनेचे नन्हा सवईथुल, आशिष शेंडे, अशोक गोवर्धन, अविनाश सवईथुल, प्रवीण रंगारी, अमोल मेश्राम आणि श्रेयश गेडाम यांनी मोलाचे सहकार्य केले.




