- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : सिंचनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

पाणी वापर संस्था आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी साधला संवाद

नागपूर समाचार : केवळ सिंचनाच्या सुविधा उभारणे पुरेसे नाही, तर त्या पाण्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कसा लाभ होईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यासाठी ‘इंटिग्रेटेड’ (समग्र) अभ्यासावर आधारित नियोजनाची गरज अधोरेखित कोणतेही काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे याचा विचार करा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री नितीन गडकरी यांनी केले.

गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत कार्यरत पाणी वापर संस्था, लाभार्थी शेतकरी तसेच सिंचन, कृषी विभाग आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना पाण्याच्या प्रभावी वापरातून शेती उत्पादन वाढवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीस गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू श्री. प्रशांत बोकारे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री गवळी, श्री पाटील, जलसंधारण विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता अनंत जगताप, श्री साखरकर, जनकल्याणकारी समिती नागपूरचे अध्यक्ष सुमंत पुणतांबेकर, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी मिलिंद जोशी आणि राजेंद्र देशकर उपस्थित होते. राजेंद्र देशकर यांनी सादरीकरण करून प्रकल्पाची सद्यस्थिती, अडचणी आणि भविष्यातील संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचवताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी मांडल्या तसेच व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी उपाय सुचवले.

ना. गडकरी पुढे म्हणाले कि, केवळ सिंचनाच्या सुविधा उभारणे पुरेसे नाही, तर त्या पाण्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कसा लाभ होईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. “उत्पादन आणि उत्पादकता वाढणे, सिंचन झालेल्या भागात रोजगारनिर्मिती होणे, छोटे उद्योग उभे राहणे आणि त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणे, या सर्वांचा एकत्रित विचार करूनच नियोजन झाले पाहिजे.

लाभार्थी कोण असतील, त्यांना नेमका काय फायदा होईल आणि त्यासाठी कोणत्या बाबींवर काम करणे आवश्यक आहे, यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विदर्भात पावसावर अवलंबून असलेली शेती मोठ्या प्रमाणावर आहे. अनियमित पावसामुळे उत्पादनात चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अनिश्चिततेला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत गोसे खुर्दसारखे मोठे सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत आहेत. नियोजनबद्ध पाणीपुरवठा झाल्यास केवळ पिकांचे उत्पादनच वाढत नाही, तर पीक विविधीकरण, दुहेरी पिकपद्धती आणि प्रक्रिया उद्योगांना चालना मिळू शकते.

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी जलसंधारण, नदीजोड प्रकल्प, जलव्यवस्थापन आणि सिंचन सुधारणा यावर सातत्याने भर दिला आहे. पाण्याचा शाश्वत वापर, शेतीपूरक उद्योगांना चालना आणि ग्रामीण विकास या त्रिसूत्रीवर त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. विदर्भात जलसंधारणाच्या कामांमुळे अनेक भागात भूजलपातळी वाढण्यास मदत झाल्याचेही दिसून आले आहे.

या बैठकीतून सिंचन प्रकल्प केवळ पाणीपुरवठ्यापुरते मर्यादित न ठेवता, त्याला शेती विकास, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण समृद्धीशी जोडण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला. संबंधित विभागांनी समन्वयाने काम केल्यास गोसे खुर्द प्रकल्प विदर्भाच्या विकासाला नवे बळ देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रास्ताविक श्री मिलिंद जोशी यांनी केले.