गडचिरोली समाचार : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर मंडळ तसेच भाजपा देसाईगंज (वडसा) ग्रामीण मंडळाच्या वतीने आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६ या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज दि. २९ मार्च रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
गडचिरोली येथे नगर परिषद भवनात तर देसाईगंज (वडसा) येथे आदर्श महाविद्यालयात या समारोप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दि. २८ व २९ मार्च दरम्यान पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला यशस्वी केले.

या समारोप प्रसंगी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी प्रभावी शब्दांत सांगितले की, “चांगल्या कार्यक्रमाचा खरा समारोप कधीच होत नाही; त्या माध्यमातून मिळालेली शिकवण आणि संघटनात्मक मूल्ये ही कार्यकर्त्यांच्या कार्यातून सातत्याने जिवंत राहिली पाहिजेत.”

तसेच त्यांनी पुढे अधोरेखित केले की, भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणभाव या मूल्यांचा अंगीकार करून कार्य करणे अत्यावश्यक आहे. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष संघटनात्मक कामात करणे हीच खरी कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रशिक्षण महाअभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती तसेच प्रभावी जनसंपर्क कौशल्य याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आगामी काळात पक्षकार्य अधिक सक्षम, सुसूत्र आणि परिणामकारकपणे राबविण्यास या प्रशिक्षणाचा निश्चितच लाभ होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
गडचिरोली येथील प्रशिक्षण महाअभियानात मंचावर माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर, कि.मो. प्र. सचिव रमेशजी भुरसे, भाजपा शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, उपनगराध्यक्ष निखिल चरडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, तसेच सोशल मिडिया विभागाचे घनश्याम वाढई, विनोद देवोजवार, दिनेश नवघडे आदी मान्यवर उपस्थित होते.
देसाईगंज (वडसा) येथील प्रशिक्षण महाअभियानात मंचावर जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, कि.मो. प्र. सचिव रमेशजी भुरसे, महिला व बालकल्याण सभापती (नगर परिषद गडचिरोली) सौ. सिमाताई कन्नमवार, तालुका अध्यक्ष सुनिल पारधी, जेष्ठ नेते माणिक बन्सोड, मारोतराव दोनाडकर, प्रशांत भुगुवार, वसंत दोनाडकर, प्रमोद झिलपे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली
कार्यक्रमास दोन्ही ठिकाणी पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. उत्साह, शिस्त आणि संघटनात्मक बांधिलकी यांचे सुंदर दर्शन घडविणारा हा प्रशिक्षण महाअभियानाचा समारोप सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.




