- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : महाराष्ट्राच्या व्हिजनमॅनच्या दृष्टिकोनातून साकारलेले नागपूरचे कॅन्सर हॉस्पिटल गोरगरिबांसाठी ठरतेय वरदान – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

नागपूर समाचार : माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून नागपूर येथे साकार झालेल्या ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला’ (एनसीआय) भेट दिली. या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दिले जाणारे उपचार जागतिक दर्जाचे असून सर्वसामान्य रुग्णांनाही परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत.  

कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर दर्जेदार उपचार माफक दरात मिळणे ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील मोठी गरज असून ती एनसीआयसारख्या संस्थेमुळे पूर्ण होत असल्याचे पाहून प्रचंड आनंद वाटला.

राज्यात वाढत असलेली कॅन्सर रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असून या विषयावर सखोल अभ्यास, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लवकर निदान यावर भर देणे अत्यावश्यक असल्याने कॅन्सर विषयातील तज्ज्ञांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन ठोस निर्णय घेतले जातील. तसेच, राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देण्याला प्राधान्य असल्याचे यावेळी ठळकपणे नमूद केले.

हॉस्पिटलमधील रुग्णसेवा, आधुनिक उपचार पद्धती, प्रगत यंत्रसामग्री तसेच संशोधन सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. केमोथेरपी, रेडिओथेरपी, शस्त्रक्रिया आणि इम्युनोथेरपीसारख्या आधुनिक उपचारपद्धती प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे पाहून समाधान वाटले. ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही याप्रसंगी आवर्जून सांगितले. 

या भेटीदरम्यान एनसीआयचे डॉ. आनंद पाठक तसेच शैलेश जोगळेकर यांनी हॉस्पिटलची कार्यपद्धती तसेच रुग्णसेवे संदर्भात राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम त्याचबरोबर रुग्णालयातील अत्याधुनिक सोयी सुविधांची माहिती दिली. त्याचबरोबर या रुग्णालयामध्ये शासनाच्या विविध आरोग्य योजना राबवून सर्व सामान्य गोर गरीब रुग्णांच्यावर उपचार केले जात असल्याचे सांगितले. यावेळी वैद्यकीय तज्ज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.