दम असेल तर तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींना ४२ टक्के आरक्षण द्या
नागपूर समाचार : महायुती सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे. हा शासन निर्णय सरकारने तात्काळ रद्द करावा. नागपुरातील आजचा महामोर्चा फक्त झाँकी आहे. ओबीसींकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईच नव्हे तर पुणे, ठाणे देखील जाम करू असा इशारा नागपूर येथील महामोर्चातून दिला.
राज्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने लाखोंच्या संख्येने यशवंत स्टेडियमवरून महामोर्चा निघाला. संविधान चौकात मोर्चा आल्यानंतर सभेत रुपांतर झाले. यात समाजबांधवांना आवाहन करताना, मराठा आरक्षणासाठी सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाड्यात दररोज हजारो प्रमाणपत्रांचे वाटप सुरू आहे. यामुळे राज्यात ओबीसी तरुणांचे आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. फक्त जरांगे यांच्या भरवश्यावर महायुती सरकार आले आहे का? ओबीसी मधील ३७४ जातींनी पण या सरकारला कौल दिला आहे, हे सरकार ते विसरले आहे म्हणून ओबीसींवर अन्याय सुरू आहे.

सरकारच्या या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या मानेवर सुरी फिरणार आहे. त्यामुळे सरकारने आताच आपली भूमिका सुधारावी नाहीतर मुंबईच नाही तर ठाणे आणि पुणे जाम करू असा इशारा यावेळी दिला. सरकारचा DNA ओबीसींचा असेल तर हा शासन निर्णय रद्द करून तुमचा डीएनए सिद्ध करा.
ओबीसी समाजात आता मराठा समाज घुसत आहे, तो समाज पैलवान आहे. एका बाजूला हिंद केसरी असलेला मराठा समाज, दुसरीकडे ओबीसी समाज हा कुपोषित आहे त्यांच्यासमोर ओबीसी कसा टिकणार? म्हणूनच ही ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई आहे.
सरकार म्हणत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, दुसरीकडे ओबीसीमध्ये घुसखोरी आहे. सरकारमध्ये दम असेल तर तेलंगणा सरकारप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.
आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, जेव्हा मराठा समाजाला EWS चे आरक्षण मिळाले तेव्हा आम्हीच पाठिंबा दिला. स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले पाहिजे पण ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे हा अट्टाहास आहे, त्याला आमचा विरोध आहे. ओबीसी समाजातील लोकांना एक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वर्ष लागते इथे मराठा समाजाला एक तासात प्रमाणपत्र दिली जात आहे हा अन्याय नाही का? आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही आम्ही लढत राहणार अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडली.
मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे असे असताना या सरकार मधील सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणतो, शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आहे, आम्ही निवडणुकीत आश्वासन देत असतो यातून सरकारची खरी नियत दिसत आहे. हे सरकार समाजा- समाजात भांडण लावत आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना भिकेला लावत आहे यांना शेतकरीच जागा दाखवेल.
विदर्भातील विविध जिल्ह्यातील सकल ओबीसी संघटनांनी या मोर्च्यासाठी तयारी केली होती. यशवंत स्टेडियम इथून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. पंचशील चौक, व्हेरायटी चौक इथून मोर्चा हळूहळू संविधान चौकाच्या दिशेने निघाला. नागपुरातील रस्त्यावर ओबीसींचे पिवळे वादळ आज दिसले. लोकांनी मोर्च्यात जय ओबीसी, जय संविधान, ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे अशा घोषणा दिल्या.
आजच्या मोर्च्यात खासदार प्रशांत पडोळे, प्रतिभा धानोरकर, श्यामकुमार बर्वे, सुनील केदार, माणिकराव ठाकरे, अभिजित वंजारी, आमदार रामदास मसराम, बाळासाहेब मांगरुळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख, रासपचे महादेव जानकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आदी उपस्थित होते.




