- Breaking News, नागपुर पुलिस, नागपुर समाचार

नागपूर समाचार : “86 जीवांना नवसंजीवनी देणारे नागपुर शहर चे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांचा “ऑपरेशन शक्ती” अंतर्गत पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार”

नागपूर समाचार : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून ऑक्टोबर 2024 मध्ये DAG (District Action Group) तयार करण्यात आला. या गटामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बालविकास विभाग, रेल्वे सुरक्षा बल, नागपूर लोहमार्ग पोलीस, नागपूर महानगरपालिका, पर्यटन व परिवहन विभाग, पर्यटन विकास महामंडळ, बालकल्याण समिती, स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवक यांचा समावेश आहे.

हे सर्व एकमेकांच्या सहकार्याने मानवी तस्करी विरोधात प्रयत्नशील आहेत.

दि. 27 जुलै 2025 रोजी नागपूर शहर पोलिसांनी “ऑपरेशन शक्ती” ची अधिकृत सुरुवात केली. यामध्ये नागपूर शहरातील 330 हॉटस्पॉट्स ज्यात फ्लॅट्स, लॉज, स्पा सेंटर, सलून तसेच इतर डार्क झोन आणि हायवे लगतचे परिसर यांचा समावेश करण्यात आला. या सर्व ठिकाणांची तपासणी करून 22 स्पेशल रिकग्निशन कॅमेरे बसविण्यात आले. तसेच 33 पोलीस ठाण्यांअंतर्गत “वुमन हेल्प डेस्क” स्थापन करण्यात आल्या. 24 तास कार्यरत राहणाऱ्या कॉटन मार्केट व गणेशपेठ बसस्थानकावरील हेल्प डेस्क सेंटरचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.यानंतर मोहिमेचा प्रचार-प्रसार आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दि 28 जुलै 2025 रोजी लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत क्लब हाऊस येथे पोलीस दीदी, भरोसा, दामिनी पथक आणि AHTU यांच्या माध्यमातून मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणविरोधात प्रशिक्षण देण्यात आले.

1 ऑगस्ट 2025 रोजी हॉटेल इंडस्ट्रीज अँड असोसिएशन यांची जनजागृती बैठक पोलीस भवनातील ऑडिटोरियम हॉल येथे झाली. या बैठकीत 150 व्यवसायिकांना “ऑपरेशन शक्ती” बाबत मार्गदर्शन करून जागरूक करण्यात आले. 4 ऑगस्टपासून सर्व व्यावसायिक हॉटेल्सच्या रिसेप्शन एरियामध्ये मोहिमेच्या “झिरो टॉलरन्स धोरण” राबवणे बाबत चिन्हे व हेल्पलाइन प्लेट्स बसविण्यात आल्यात. 6 ऑगस्ट 2025 दरम्यान सार्वजनिक वाहतूक साधनांतून विशेषतः ऑटोचालकांच्या सहभागाने ‘यंग इंडिया ऑन चेंज’ व NSS स्वयंसेवकांच्या मदतीने पोलिसांनी जनजागृती केली. यात ऑटोचालकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. तसेच OYO कंपनीचे उपाध्यक्ष गगनदीप गुप्ता यांच्यासोबत महत्त्वपूर्ण परिसंवादही झाला. एअरपोर्ट परिसरात CISF आणि प्रकृती फाउंडेशन च्या सहकार्याने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

“मानवी तस्करीविरोधातील चार स्तंभ” हा लेख विनिता वेद सिंगल (प्रमुख सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग, मुंबई) यांचा लेख प्रकाशित झाला.गणेशोत्सव काळात ऑपरेशन शक्ती टीमने ‘पोलीस दीदी’ व ‘पोलीस काका’ यांच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांमध्ये जनजागृती बॅनर्स व पोस्टर्स लावून नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 1 ऑगस्ट 2025 रोजी लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत गंगा-जमुना रेड लाईट एरिया मधील 3 खोल्यांवर सील कारवाई करण्यात आली. या प्रकारे ऑपरेशन शक्ती राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर पोहोचली.

एकीकडे जनजागृती तर दुसरीकडे प्रत्यक्ष छापेमारी कारवाई करून मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणात सहभागी समाजकंटक, दलाल यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचबरोबर या व्यवसायात अडकविण्यात आलेल्या पीडितांची सुटका करण्यात आली.

महत्त्वाच्या कारवायांमध्ये गोंडवाना चौकातील आकार बिल्डिंग (कॉपर सलून) येथील छापा, वाटोडा पोलीस ठाण्याअंतर्गत 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून राजस्थानमध्ये बळजबरीने लग्न लावल्या प्रकरणी 2 महिला व 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलीची राजस्थानहून 24 तासांत सुटका, हिंगणा येथील महालक्ष्मी कृपा गेस्ट हाऊस व कानोलीबारात येथील छापा, सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत 2 लहान मुलींची सुटका, गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत स्वॅग से राहुल हॉटेल बसस्टँड जवळील छापा, नवीन कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत ड्वेल स्टे कॉकटेल कॅमेल फार्म हाऊस येथील छापा,बेलतरोडी पोलीस ठाण्याअंतर्गत लोटस सर्व्हिस अपार्टमेंटवरील छापा, हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत सेक्स रॅकेटचा भांडाफोड, प्रतापनगर पोलीस ठाण्याअंतर्गत आयकॉन स्पा अँड सलूनवरील कारवाई,भिलगाव येथील OYO हॉटेलवरील छापा अशा अनेक कारवाया झाल्या.यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या कारवाईत बाल संरक्षण अधिकारी व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने 3 वर्षांपासून कैद असलेल्या बालकांची सुटका करण्यात आली. या कारवाईत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी पोलिसांना महत्त्वपूर्ण मदत केली. अलीकडेच अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या बांधकामस्थळी 7 अल्पवयीन मजुरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट या एनजीओने सहकार्य केले.

या सर्व कारवायांमुळे आजपर्यंत ऑपरेशन शक्ती अंतर्गत एकूण 38 प्रकरणांमध्ये दखल घेण्यात आली असून, 21 अल्पवयीन मुली व 65 महिला अशा एकूण 86 पीडितांची सुटका करण्यात आली. तसेच 59 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.या उत्कृष्ट कामगिरीसाठी आज दि 16 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.00 वा पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी “ऑपरेशन शक्ती” अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभाग व पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार असे एकूण 42 जणांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात सामाजिक सुरक्षा शाखेचे राहुल शिरे, एनडीपीएसचे गजानन गुल्हाने, सपोनी चुलपार, शिवाजी ननावरे, बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, अजनी पोलीस ठाण्याचे नितीन राजकुमार, वाठोडा पोलीस ठाण्याचे हरीशकुमार बोराडे तसेच इतर अधिकारी-अंमलदारांचा पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त व ऑपरेशन शक्तीच्या नोडल अधिकारी मेहक स्वामी व पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व रोपटे देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रम शेवटी पोलीस आयुक्तांनी असे प्रतिपादन केले की, “ऑपरेशन शक्ती हा उपक्रम पुढेही सातत्याने चालू ठेवून अजून प्रभावी कारवाईद्वारे जास्तीत जास्त पीडितांची सुटका करून मानवी तस्करीचे पाळेमुळे उखडून टाकणे हेच ध्येय आहे आणि याप्रमाणेच कारवाई झाली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *