सावनेर समाचार : १५ ऑगस्ट २०२५ रोजी सावनेर शहरात सुरक्षा कवच या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सावनेर सेफ सिटी प्रोजेक्ट अंतर्गत बसवण्यात आलेल्या या प्रकल्पात ९१ सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यामध्ये Facial Recognition System आणि Automatic Number Plate Recognition System (ANPR) बसवण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा डेटा संग्रहित करता येणार असून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
या प्रकल्पांतर्गत सावनेर शहरातील १५ डार्क क्राईम स्पॉट्स कव्हर करण्यात आले असून गडकरी चौक, गांधी चौक, बस स्टॅन्ड, बाजार चौक, होळी चौक, शिवाजी चौक यांसह सर्व प्रमुख प्रवेश व निर्गमन मार्गावर सीसीटीव्ही द्वारे काटेकोर नजर ठेवली जाणार आहे.
कार्यक्रमात लोकसभा सदस्य श्यामकुमार बर्वे, विधानसभा सदस्य डॉ. आशिष देशमुख, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह नागपूर ग्रामीण पोलीस अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या मनोगतातून ही यंत्रणा जनतेमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करेल, गुन्हेगारीवर वचक बसेल आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास व्यक्त केला.
डिजिटल पुराव्याचे महत्त्व लक्षात घेता ही सीसीटीव्ही यंत्रणा दोषसिद्धी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही प्रतिपादन करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस विभागाच्या यशस्वी कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाची राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाने, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सावनेरची प्रथम क्रमांकाने आणि उमरेड पोलीस स्टेशनची प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ४०० ते ५०० नागरिक, शासकीय अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.