नागपूर समाचार : केंद्र व राज्य शासनाच्या ‘हर घर तिरंगा २०२५’ अभियानांतर्गत व मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाजवळ शहरातील कलाकारांसासाठी पहिल्यांदाच उभारण्यात आलेल्या ‘कलाकार कट्टा’ चे नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी(ता.१५) उद्घाटन करण्यात आले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ‘कलाकार कट्टा’ कलादानाचे आणि ‘भारताची यशोगाथा’ या कलाकृतींचे प्रदर्शनीचे उद्घाटन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूरचे अधिष्ठाता डॉ.विश्वनाथ साबळे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त सतीश चौधरी, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, रवींद्र बुंधाडे, उपअभियंता श्री. राजेंद्र जीवतोडे, कनिष्ठ अभियंता अनंत मानकर, महाविद्यालयाचे प्रा. पंकज इटकेलवार, अधिव्याख्याता संजय जठार, विनोद चव्हाण, माजी विद्यार्थी अभिजीत मौंदेकर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी व कलाप्रेमी आदी उपस्थित होते.
शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाजवळ मनपाद्वारे पहिल्यांदाच शहरातील कलाकारांसासाठी ‘कलाकार कट्टा’ या खुले कलादान उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे जनमनात राष्ट्रीय भावना जागृत व्हावी, या उद्देशाने ७९ व्या स्वातंत्र्य दिनी ‘भारताची यशोगाथा’ कलाकृतीचे चित्रण करण्यात आले आहे.
विद्यार्थी आणि विद्यार्थी समितीतर्फे काढण्यात आलेल्या 30 बाय 4 फूट असे भव्य कॅन्व्हास (म्युरल) चित्रात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देणारे क्रांतिकारक राष्ट्रपिता महात्मा गांधी, वीर सावरकर व इतर आणि स्वातंत्र्योत्तर कृषी, विज्ञान, साहित्य, कला, क्रिडा, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लता मंगेशकर, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, कल्पना चावला, डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्यासह अनेक भारतीयांचे चित्र साकारून त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी ‘कलाकार कट्टा’ या खुले कलादानाचे फीत कापून अनावरण केले आणि विद्यार्थीच्या कलेची प्रशंसा केली. याप्रसंगी त्यांनी कलाकारांचे महत्व अधोरेखित केले. मनपा सदैव कलाकारांच्या पाठीशी खंबीपणे उभे राहील अशी ग्वाही यावेळी मनपा आयुक्त यांनी दिली.